World Theatre Day 2023 : आज जागतिक रंगभूमी दिन आहे. आज देशभर हा दिवस साजरा होतोय. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत जागतिक रंगभूमी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्ही, सिनेमात काम करणारे अनेक मराठी कलाकारांनीही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपल्या रंगभूमीवरच्या आठवणी, किस्से, फोटो शेअर केले आहेत. एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. शाळेत असताना तिने 'चाणक्य की प्रतिज्ञा' या हिंदी एकांकिका स्पर्धेत प्रमुख भूमिका साकारली होती. यासाठी प्रथम पारितोषिकही पटकावलं होतं. त्याचेच फोटो तिने शेअर केले आहेत. फोटोतील या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत. अद्यापही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. तिचं नाव प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad).
'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता गायकवाड फोटोत दिसते आहे. या मालिकेत प्राजक्तानं महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेनं प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. याच प्राजक्ताने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त काही जुने फोटो शेअर केले आहेत. आज जागतिक रंगभूमी दिन....याच निमित्तानं शाळेत असताना 'चाणक्य की प्रतिज्ञा' हे हिंदी एकांकिका स्पर्धेत केलेलं नाटक. त्यात केलेली चाणक्याची प्रमुख भूमिका... सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी प्रथम क्रमांक पटकावला, त्याचेच काही फोटो..., असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत शिवपुत्र संभाजी नाटकात काम करतेय. सध्या या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम या मालिकेत काम केलेय. सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं.