Join us

'संभाजी' मालिकेतील येसूबाईंची भूमिका साकारण्यासाठी प्राजक्ता घेतेय लय'भारी' मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 2:17 PM

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय असून वेळोवेळी या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय असून वेळोवेळी या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. या मालिकेसाठी प्राजक्ताने बरीच मेहनत घेतली तसेच तिने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं.

मालिकेतल्या आगामी भागांसाठी प्राजक्ताने नुकताच चिलखत आणि तलवार घेऊन येसूबाई मोहिमेवर निघाल्याचा प्रसंग चित्रित केला. या प्रसंगासाठी हा चिलखत खरा बनवण्यात आला आणि त्यासाठी वेशभूषा टीमला जवळ जवळ २ आठवडे लागल्याचे प्राजक्ताने सांगितले.

तसंच या चिलखताचे वजन ५ किलोपेक्षा जास्त होते. त्यामुळे चिलखत, दागिने, येसूबाई गरोदर असल्यामुळे लावण्यात आलेलं पोट आणि डोक्यावर लोखंडी शिरस्त्राण यामुळे जवळपास १५ किलोचं वजन अंगावर पेलून प्राजक्ताने चित्रीकरण पूर्ण केले. या अनुभवाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, "मी पहिल्यांदा चिलखत घालून चित्रीकरण केलं. कौतुकाची बाब म्हणजे हा चिलखत या प्रसंगासाठी खास बनवून घेण्यात आला, त्यामुळे त्याचं वजनही तितकंच होतं.

डोक्यावर जड लोखंडी शिरस्त्राण (हेल्मेट) असल्यामुळे मला माझी मान हलवणं देखील मला थोडं अवघड जात होतं. पण थोड्या सरावानंतर मी चित्रीकरण व्यवस्थित पूर्ण करू शकली. येसूबाईंच्या भूमिकेने मला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. चिलखत आणि तलवार घेऊन चित्रीकरण करताना मला एक वेगळीच प्रेरणा मिळाली. संभाजी राजे रायगडावर नाहीत आणि स्वराज्यावर हसन अली खानचे संकट येत आहे, यात येसूबाई मोहिमेवर निघण्याची तयारी करतात हा प्रसंग चित्रित केला गेला. या काळात त्यांच्या पोटात शाहूराजे असतात, मात्र ही स्त्री किती कणखर होती हे यातून अनुभवता येते. हे चित्रीकरण मी कधीच विसरू शकत नाही."    

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीप्राजक्ता गायकवाडझी मराठी