Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये रोज नवनवीन भन्नाट किस्से पाहायला मिळाले. १०० दिवसांचा शो यंदा मात्र ७० दिवसांवर आला. या सीझनमध्ये सर्वाधिक गाजला तो अभिनेता रितेश देशमुखचा भाऊचा धक्का. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची रितेशने शनिवारी-रविवारी चांगलीच शाळा घेतलेली पाहायला मिळलं. तसेच सर्वच स्पर्धकांनी देखील नेहमीच चर्चेत राहून लक्ष वेधून घेतलं. याच सर्वाधिक चर्चा रंगली ती गुलीगत फेम सूरज चव्हाणची. सूरजचं साधं वागणं सर्वांनाच आवडलं.
गुलीगत फेम सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. गावातून, अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने बॉस मराठीची ट्रॉफी पटकावली. सोशल मीडियावर सूरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कलाकरांसह नेते मंडळींनी देखील त्याचं खूप खूप अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सूरजसाठी खास पोस्ट केली आहे.
"तुझा हाच स्वभाव महाराष्ट्राला भावला" असं म्हणत प्राजक्ता माळीने सूरजचं झापुक झुपूक अभिनंदन केलं आहे. "खूप खूप अभिनंदन सूरज! तुझ्यातला प्रामाणिकपणा आणि जिद्द बिग बॉसच्या घरात तुला भेटल्यावर अगदी स्पष्टपणे जाणवली होती... कदाचित तुझा हाच स्वभाव महाराष्ट्राला भावला... महाराष्ट्राच्या मनात तू स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलास आणि बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलस! पुन्हा एकदा खूप खूप, तुझ्या भाषेत झापुक झुपूक अभिनंदन" असं प्राजक्ताने म्हटलं आहे.
बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरजने लोकमत फिल्मीला त्याची प्रतिक्रिया दिली आहे. "मी कलर्स मराठीचे मनापासून आभार मानतो. या पर्वाचा विजेता ठरल्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे. मी याआधीही म्हटलं होतं या पर्वाची ट्रॉफी मीच घेऊन जाणार. बिग बॉस' मधून मिळालेल्या धनादेशाचा उपयोग मी माझं घर बांधण्यासाठी करणार आहे. बिग बॉसच्या घराप्रमाणेच मला माझं घरं बांधायचं आहे" असं सूरज चव्हाणने म्हटलं आहे.