Join us

सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ता माळीची महिला आयोगाकडे तक्रार, कायदेशीर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:56 IST

सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केली असून ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही तिने म्हटलं आहे.

भाजपा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर आता प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली. 

काय म्हणाली प्राजक्ता माळी? 

"सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीचा मी निषेध करते. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. मी या सगळ्याला शांतपणे सामोरी जातीय. पण, याला माझी मुकसंमती आहे असं नाही. एक व्यक्ती बोलते. महिलांची अब्रु निघते. हा विषय इतका खोटा आहे. ही गोष्ट धादांत खोटी आहे. ती एकमेव भेट आमची एकच शब्द बोललो. खोटी गोष्ट किती काळ टिकणार म्हणून मी शांत बसले. माझं कुटुंब, मित्र परिवार आणि प्रेक्षकांनी मला साथ दिली. सगळ्यांनी मला हेच सांगितलं की शांत राहा. या अफवा उठतात आणि त्या निघून जातात. मला माझ्या चारित्र्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज वाटली नाही. ही वेळ येतेय ही नामुष्की आहे. ही वेळ आली कारण, एका लोकप्रतिनिधींने भाष्य केलं. काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला तुम्हासमोर यावं लागलं. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही एक राजकारणी आहाता मी एक कलाकार आहे. तुमच्या राजकारणात कलाकारांचा संबंध काय? ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी बोलले. परळीला पुरुष कलाकार कार्यक्रमाला कधीच गेले नाहीत का? महिलांचीच नावं तुम्ही का घेता? पण, त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नावं घेतली. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे.  महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. तुम्ही फक्त महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात तर तुम्ही त्यांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवत आहेत.  

मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा. हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते. माझी आई झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केलेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी. 

करुणाताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वत: एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होणार? मी सांगू इच्छिते की तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे. यापुढे कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही. महिल्यांच्या बाबतीत तुम्ही संवेदशनशीलपणे बोलाल. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसुरेश धस