प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे. तिची प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करते. आधी 'जुळून येती रेशीमगाठी' मधून तिने सर्वांना प्रेमात पाडलं. तर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मुळे ती घराघरात पोहोचली. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी आता तिच्याऐवजी कोणाचीच कल्पना करता येणार नाही. नुकतंच प्राजक्ताने तिच्या भविष्यातील प्लॅनिंगचा खुलासा केला.
प्राजक्ता माळीने 'मुक्कामपोस्ट मनोरंजन' या पॉडकास्टला मुलाखत दिली. यामध्ये प्राजक्ताला लग्न, मूलबाळ याविषयी विचारण्यात आलं. प्राजक्ता भविष्यात स्वत:ला आई म्हणून पाहते का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "नाही मला नाही वाटत. कधीच कशासाठी नाही म्हणून नये असं म्हणतात. पण मला असं वाटतं मी मुलं दत्तक घेईन. एक नाही तर पाच-सहा. एकाने काय होणार आहे इतकं तर मनात प्रेम आहे की एक-दोघाने काही होणार नाही. पाच सहा तरी मुलं मी दत्तक घेईन."
हा प्रश्न येण्यामागचं कारण म्हणजे प्राजक्ता मुंबईत एकटी राहते तर तिचं कुटुंब पुण्यात राहतं. तिला दोन गोंडस भाच्या आहेत. प्राजक्ता पुण्याला जाते तेव्हा भाच्या कसं कल्ला करत अख्खं घर डोक्यावर घेतात हे तिने सांगितलं. प्राजक्ता म्हणाली, 'मला इथे मुंबईत घरी शांत वाटतं. पण पुण्याला दोन दिवस जरी गेलं तरी भाच्यांची एवढी चॉव चॉव असते. त्यामुळे तिकडे शांतता मिळत नाही."
प्राजक्ता माळी केवळ अभिनेत्रीच नसून सूत्रसंचालिका, नृत्यांगना, यशस्वी व्यावसायिका, कवयित्री, निर्माती अशीही आता तिची ओळख आहे. तिच्या निर्मितीत बनलेला पहिला सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे ज्यात प्राजक्ता स्वत: मुख्य भूमिकेत आहे.