'महाराष्ट्राची हासयजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा सध्याचा टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम. प्रेक्षकांनी या शोला भरभरुन प्रतिसाद दिलाय. तसंच यातील कलाकारांनीही मेहनतीने काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मध्यंतरी हास्यजत्रेने ब्रेक घेतला होता. हास्यजत्रेची संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यावर होती. त्यामुळे चाहते त्यांची भारतात आठवण काढत होते. तर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होतेय अशी बातमी येताच चाहत्यांना आनंद झाला.
दोन महिन्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम पुन्हा सुरु होत आहे. प्रसाद ओक, सई ताम्हणकर यांच्यासोबतच सर्व कलाकारही उत्साहात आहेत. तर कार्यक्रमाची सूत्रसंचालिका सर्वांची लाडकी प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत चाहत्यांना झलक दाखवली. हास्यजत्रेच्या स्टेजवर नेहमीप्रमाणेच कलाकारांची धमाल बघायला मिळत आहे. 'आणि काल शूटींगला सुरूवात झाली…#महाराष्ट्राचीहास्यजत्रा...सर्वात गरजेची लाफ्टर थेरपी सुरु झाली आहे...१४ ऑगस्टपासून सोम ते गुरु' असं कॅप्शन प्राजक्ताने व्हिडिओला दिलं आहे.
प्राजक्ताच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट करत आनंद व्यक्त केलाय. 'बरं झालं तुम्ही परत आलात...रोज जुने एपिसोड्स बघत होतो' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये किती उत्सुकता आहे दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा नव्या हंगामासह हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्याने सुरु होणाऱ्या कार्यक्रमात प्रियदर्शिनी इंदळकर, वनिता खरात, समीर चौघुले, इशा डे, शिवाली परब आणि दत्तू मोरे दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये विशाखा सुभेदार आणि ओंकार भोजने दिसत नाहीयेत. त्यामुळे या कार्यक्रमात पुन्हा ओंकारला आणा ही एकच मागणी चाहते करत आहेत.