उत्तम अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा असलेल्या प्राजक्ताने सिनेसृष्टीत अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवरही ती पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसते.
प्राजक्ताने नुकतंच एका बालिकाश्रमाला भेट दिली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सई ताम्हणकरच्या भक्षक सिनेमाचा उल्लेख केला आहे. त्याबरोबरच समाजातील अशा मुलींना मदत करण्याचं आवाहनही प्राजक्ताने केलं आहे.
प्राजक्ता माळीची पोस्ट
२ दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला…
कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींग मध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं.
सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खुलाच आहे.(राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. - नियम व अटी लागू.)
ह्या बालिकाश्रमासाठी भाई ठाकूर व परिवाराचे आभार. 🙏
(भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.)
प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. दरम्यान, सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.