'कारभारी लयभारी' मालिकेतील गंगाची भूमिका साकारून अभिनेत्री प्रणित हाटे (Pranit Hate) घराघरात पोहचली. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक झाले होते. खरेतर प्रणित ट्रान्सजेंडर आहे. मराठी कलाविश्वाला मिळालेला पहिलावहिला ट्रान्सजेंडर चेहरा म्हणून प्रणितने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला इथंपर्यंत पोहचण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला. दरम्यान आता तिला नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये वाईट वर्तणूक मिळाली. त्यासंदर्भात तिने व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
एका कार्यक्रमासाठी प्रणित हाटे नाशिकमध्ये आली आहे. तिथे तिने एका हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मात्र ती ट्रान्सजेंडर असल्यामुळे तिचे हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात आले. तिला आलेला हा वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेनंतर प्रणितने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. ज्यात तिने फोटो शेअर करत लिहिले की, एका शोसाठी मी आज नाशिकमध्ये आले आहे आणि इथे मी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. मात्र आता त्यांनी माझे बुकिंग रद्द केले आहे. जेव्हा त्यांना रद्द करण्यामागचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही ट्रान्सजेंडर आहात..तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्यासाठी परवानगी नाही. अशावेळी ट्रान्सजेंडरने कुठे जायचे?, असा सवालदेखील प्रणितने केला आहे.
इंस्टाग्राम स्टोरीनंतर प्रणितने सोशल मीडियावर लाइव्ह येत संताप व्यक्त केला. ती म्हणाली की, मला माहित नाही किती जणांनी इंस्टाग्रामवरील स्टोरी पाहिली असेल. यावर काय करता येईल ते मला कळवा. मी आता नाशिकमध्ये आहे. पूजा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहे. इकडे एका शोसाठी आले होते. नाशिकमध्ये माझा कार्यक्रम असल्यामुळे मी कालपासून हॉटेलमध्ये बुकिंग केली होती. आज चेकिंगवेळी मी इथे आले. तेव्हा माझे सर्व डॉक्युमेंट्स घेतले आणि कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर माझे बुकिंग रद्द करत असल्याचे सांगितले. कारण मी ट्रान्सजेंडर आहे.
तर आता हा प्रश्न आहे, माझ्यासारखे अनेक ट्रान्सजेंडर आहेत, जे कार्यक्रमासाठी बाहेर जातात किंवा कोणत्या कामानिमित्ताने बाहेर जातात. एक महत्त्वाचे सांगते की, आम्ही कुठलेही चुकीचे काम करण्यासाठी आलेलो नाहीत. आम्ही वायफळ आणि घाणेरडे काम करायला आलो नाहीत. ज्याच्यामुळे आमचे हॉटेलमधील बुकिंग रद्द केली जातेय.
ती पुढे म्हणाली की, आम्हाला एवढंच कारण सांगितले की, तुम्ही ट्रान्सजेंडर आहात त्यामुळे तुमची बुकिंग रद्द केली. अशावेळी आम्ही कुठे जायचे? बुकिंग कुठे करायची? आता हॉटेलमध्ये लोगो लागणार आहेत का? किती हास्यास्पद आहे हे. आता आम्ही कार्यक्रमासाठी तयार कुठे होणार? आराम कुठे करणार ? या क्षणी काय करायला हवे? कुठे तक्रार दाखल केली पाहिजे? ट्रान्सजेंडर आहोत म्हणूव आम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार नाहिये का? मी आजारी असते आणि खूप गरज असेल तर काय केले असते? असे अनेक प्रश्न तिने विचारले आहेत.