कोरोना काळात मनोरंजनसृष्टीची संपूर्ण घडी विस्कटली आहे. ही घडी पुन्हा बसवायची तर प्रेक्षकांना नवं काही द्यावंच लागणार. याचाच एक भाग म्हणून येत्या काळात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे, अनेक प्रसिद्ध चेहरे सध्या मालिकांमध्ये दिसत आहेत. उमेश कामात, मुक्ता बर्वे, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संजय नार्वेकर ही कलाकार मंडळी सध्या टीव्हीवर झळकतायत. आता या यादीत आणखी दोन कलाकारांची भर पडणार आहे. होय, श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) ही जोडी एका नव्या मालिकेत दिसणार आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgathi) असं या मालिकेचं नाव आहे.
‘महाराष्ट्र टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी टीव्हीवर पुनरागमन करण्यामागंच कारणही सांगितलं.‘मला गेल्या काही वर्षात खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. म्हणून मी जाणीवपूर्वक मालिकांना नकार देत गेले. परंतु गेली दोन वर्ष मी चित्रपटांमध्ये देखील झळकलेली नाही. त्यामुळे सतत मला चित्रपटात कधी झळकणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे मला एक कळलं की प्रेक्षकांना मला पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेद्वारे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला,’ असं प्रार्थनानं सांगितलं.
‘एक कलाकार लोकांच्या नजरेआड जातो, तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यातून निघून जातो. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. इथे प्रत्येकवेळी तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या असण्याची जाणीव करून द्यावी लागते. मी सुद्धा याला अपवाद नाही. प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये,अशी माझीही इच्छा आहे. त्यामुळेच मी मालिका करण्याचा निर्णय घेतलायं,’ असं ती म्हणाली.