प्रसाद खांडेकर-नम्रता संभेरावचं नवं नाटक, सोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार! शुभारंभाचा प्रयोग कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 12:20 PM2024-12-09T12:20:46+5:302024-12-09T12:21:35+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय कलाकारांसोबत प्रसाद-नम्रताचं नवं नाटक रंगभूमीवर सुरु होणार आहे
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील कलाकार सर्वांचे लाडके अभिनेते. या शोमधील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचा नवीन सीझन काहीच दिवसांपूर्वी सुरु झालाय. या शोमधील सर्वांची लाडकी जोडी म्हणजे प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. या दोघांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शिवाय विविध नाटक, सिनेमांमध्येही एकत्र काम केलंय. आता प्रसाद-नम्रता एकत्र एका नाटकात अभिनय करत आहेत. त्यांच्यासोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लाडके कलाकारही दिसणार आहेत.
नम्रताने पोस्ट शेअर करुन दिली आनंदाची बातमी
अभिनेत्री नम्रता संभेरावने पोस्ट शेअर नव्या नाटकाविषयी माहिती सांगितलीय. नम्रताने लिहिलं की, "गणपती बाप्पा मोरया.. नाटक प्रेम आहे, श्वास आहे, जीव आहे सांगण्यास अत्यानंद होतोय कि आपल्या नवीन नाटकाचा श्री गणेशा होतोय, ह्या महिन्यापासून रंगमंचावर पुन्हा एकदा रुजू होणार आहोत. रंगमंच, हाऊसफूल च्या पाट्या,प्रेक्षकांच्या टाळ्या, अतोनात प्रेम आणि तुमची उपस्थिती ह्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. एक नवा कोरा नाट्यानुभव, आपल्या जवळच्या नाट्यगृहात नक्की या.. आता आपली थेटभेट होईल प्रेक्षागृहात.... प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित.. “थेट तुमच्या घरातून”"
नम्रता-प्रसादच्या नव्या नाटकाविषयी
नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर आगामी 'थेट तुमच्या घरातून' या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नाटकात त्यांच्यासोबत ओंकार राऊत, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई हे कलाकार झळकणार आहेत. या नव्या नाटकाच्या लेखन अन् दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद खांडेकरने सांभाळली आहे. शनिवार २१ डिसेंबर रात्रौ ८.३० वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.