‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने २०१६ साली गळफास घेत आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर ७ वर्षांनंतरही तिच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहवर तिच्या आत्महत्येचा आरोप आहे. या आरोपातून मुक्त करण्याची मागणी राहुलने न्यायालयाकडे केली होती. याप्रकरणी न्यायालयाने राहुलला खडे बोल सुनावले आहेत. प्रत्युषाने राहुलमुळेच आत्महत्या केल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
राहुल राजने १४ ऑगस्टला प्रत्युष्याच्या आत्महत्येच्या आरोपातून मुक्तता करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी(३० ऑगस्ट) न्यायाधीश समीर अंसारी(दिंडोशी न्यायालय) यांनी त्याची ही याचिका फेटाळून लावली. “राहुलने प्रत्युषाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं. आरोपीने शारीरिक आणि भावनिकरित्या प्रत्युषाचं शोषण केलं. यामुळे प्रत्युषाने तणावातून आत्महत्येचं पाऊल उचललं. राहुलने तिला तणावातून बाहेर काढण्यासाठीही कोणतेच प्रयत्न केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने वागणुकीमुळे प्रत्युषाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं”, असं कोर्टाने म्हटलं आहे.
“प्रत्युषाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतानाही आरोपीने तिला ड्रग्ज पुरवले, असंही कोर्टाने म्हटलं आहे. राहुलने प्रत्युषाला जबरदस्तीने दारूही पाजली असल्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. राहुलने केवळ पैशांसाठी प्रत्युषाचा वापर करुन घेतला. कर्ज फेडण्यासाठी आणि जीवनात आर्थिक स्थैर्यासाठी राहुलने प्रत्युषाचा वापर केला, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
प्रत्युषाने १ एप्रिल २०१६ साली आत्महत्या करत जीवन संपवलं. अभिनेत्रीच्या आईने प्रत्युषा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहविरोधात तक्रार नोंदविली होती. राहुलविरोधात आयपीसी ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), ५०४(जाणूनबुजून अपमान करणे), ५०६(धमकी देणे) आणि ३२३ या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.