महाभारत (Mahabharat) या गाजलेल्या पौराणिक मालिकेतील भीम (Bheem) अर्थात हे पात्र साकारणारे अभिनेत प्रवीण कुमार सोबती आज आपल्यात नाही. (Praveen Kumar Sobti passes away) वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. चित्रपटांपासून फिल्मी करिअर सुरू करणाऱ्या प्रवीण यांना ‘महाभारत’ या मालिकेने ओळख दिली. अॅक्टिंग सुरू करण्याआधी प्रवीण कुमार हे बीएसएफ जवान होते. त्यांना भीमाची भूमिका कशी मिळाली, याची कहाणी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.2020 मध्ये खुद्द प्रवीण कुमार यांनी एका मुलाखतीत ही भूमिका कशी मिळाली, याचा खुलासा केला होता.
मी बी आर चोप्रांकडे गेलो आणि त्यांनी मला साईन केलं...त्यांनी सांगितलं होतं की, बी. आर. चोप्रा महाभारत बनवत असल्याचे मला माझ्या एका जवळच्या मित्राने सांगितलं होतं. मालिकेचं सर्व कास्टिंग पूर्ण झालं असून फक्त भीमाचं कास्टिंग बाकी आहे. या भूमिकेसाठी तू फिट बसतोस,तेव्हा ट्राय कर, असं तो मित्र मला म्हणाला होता. यानंतर मी लगेच बी. आर. चोप्रांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. मी त्यांना भेटलो आणि त्यांनी लगेच मला साईन केलं. भीमाच्या भूमिकेसाठी माझी शरीरयष्टी योग्य होती. पण आवाजाची अडचण होती.
आणि ते ऐकून मी संतापलो... भीमाच्या भूमिकेची तयारी मी सुरू केली होती. काही दिवस मी स्वत:च माझे डायलॉग म्हटले. पण क्रू मेंबर्सला ते आवडले नसावेत. आम्ही दुसºयाकडून डबिंग करून घेऊ, असं ते मला म्हणाले आणि ते ऐकून मला प्रचंड राग आला. मी काही मूर्ती नाही. मी माझ्या पात्राला स्वत: आवाज देणार,असं मी तावातावात म्हणालो. मला फक्त आठवडाभराचा वेळ द्या, अशी विनंती मी बी. आर. यांना केली. त्यांनी परवानगी दिली. मग काय, माझ्याकडे फक्त आठवडा होता. मी महाभारत हा ग्रंथ खरेदी केला आणि जोरजोरात वाचत सराव सुरू केला. काही कठीण शब्द होते. ते कागदावर लिहून मी जोरजोरात म्हणू लागलो. आठवडाभर मी हेच करत होतो. आठवड्यानंतर सेटवर गेलो आणि मी सगळ्यांना प्रभावित केलं, असंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं