Join us

टेलिव्हिजनच्या खलनायिकेची हळवी बाजू, मानसिक आरोग्याबाबत म्हणाली "ग्लॅमरच्या पलीकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:05 IST

गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे मानसिक आरोग्य ह्या विषयाची जास्त मोकळेपणाने चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.

Apurva Nemlekar Post About Mental Health: एखादी मालिका प्रसिद्ध होण्यात मुख्य नायक-नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. या ग्रे शेड असलेल्या व्यक्तिरेखा मालिकांमध्ये डावपेच आखताना दिसतात. पण, खऱ्या आयुष्यात कायमच मृदू भाषी असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. पडद्यावरचा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र विविध संकटांना तोंड देत असतात. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतील 'सावनी' ही खलनायिका सध्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारतेय. तिची ही भुमिका सध्या चांगलीच गाजतेय. एकीकडे खलनायिका अशी छबी असताना वैयक्तिक आयुष्यात अपूर्वाचा एक हळवा कोपरा आहे. गेल्या काही वर्षांत तिनं अनेक संकटांना तोंड दिलं आहे. नुकतंच अपूर्वानं तिच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं. 

अपूर्वा नेमळेकरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात अपुर्वानं ग्लॅमरच्या पलिकडे असलेल्या तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. वडील आणि धाकट्या भावाच्या निधनानंतर तिचं आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नसल्याचं तिनं सांगितलं. अपूर्वा लिहते, "एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून लोकांना अनेकदा ग्लॅमर, हास्य आणि एक ताकद दिसते. पण, पडद्यापलिकडे ज्या मूक लढाया लढतो, त्या क्वचितच दिसतात.  माझ्या आयुष्यातील दोन सर्वात महत्त्वाचे पुरुष... ते म्हणजे माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ. त्यांना गमावल्यानंतर माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. असे काही क्षण येतात जेव्हा मला सुरक्षित वाटत नाही, काही ऐकलं किंवा पाहिलंही जात नाही. मी अनेकदा त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाची आणि पाठिंब्याची आतुरतेने वाट पाहत असते".

पुढे तिनं लिहलं, "गेल्या काही वर्षांत मी धाडसी मुखवटा धारण केलाय. अनेकदा मी ठीक नसूनही ठीक असल्याचं भासवलं आहे. आता मला हे सांगावंस वाटतं की, दुःख करणे ठीक आहे, निराश होणे ठीक आहे, खंबीर असणं हा एकमेव पर्याय असतानाही तुम्ही एकटं चालणं ठीक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या भावनांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कारण मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे इतर कोणत्याही गोष्टी इतकेच महत्त्वाचे आहे"

 "अशाच टप्प्यातून जात असलेल्या प्रत्येकासाठी मी सांगू इच्छिते की, तुम्ही एकटे नाही आहात. धाडसी व्हा आणि स्वत:वर प्रेम करा. आयुष्यातल्या सर्व अनिश्चिततेसह आणि वेदनांसह स्वत:चा स्विकार करा. कारण अगदी कठीण क्षणांमध्येही सौंदर्य आहे. आता आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलणं  सहज करुया.... आपल्या प्रियजनांची आठवण काढणं आणि तरीही पूर्णपणे जगण्याचे धैर्य शोधणे, हे सामान्य करुया. कधीही हार मानू नका,  असं म्हणतं अपुर्वानं  मानसिक त्रासाचा सामना करणाऱ्या अनेकांना प्रेरणा दिली आहे. 

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरमानसिक आरोग्य