तेजश्री प्रधान (tejashree pradhan) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजश्रीला आपण विविध सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. तेजश्रीने काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' (premachi goshta) मालिकेला रामराम ठोकला. तेजश्रीने मालिकेत साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुकही झालं. तेजश्री गेल्या अनेक वर्षांपासून विविध भूमिकांच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर काम करतेय. तेजश्रीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल एका मुलाखतीत केलेलं विधान चर्चेत आहे.
तेजश्री टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाली?
मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री म्हणाली की, "टेलिव्हिजन करताना कुठेतरी वाईट हेच वाटतं की, आपण २१ व्या शतकात आलोय पण अजून कळत नाहीये की, सासू-सुना, कारस्थानं आपण त्याच विषयांमध्ये आहोत. एक खलनायक येणार, तो काहीतरी करणार आणि मग सासू काहीतरी बोलणार. त्या सुनेने मग ऐकायचं, सहन करत राहायचं.. म्हणजे आपण कुठे चाललोय! खऱ्या आयुष्यात आपण जगताना एक छान, स्वतंत्र व्यक्ती म्हणून मस्त जगत असतो. पण टेलिव्हिजनचं माध्यम थोडंसं कुठेतरी मागे आहे का, असा विचार येतो."
"पण पुन्हा कळत नाही, कारण.. म्हणावं तर मुंबई - पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या गोष्टी काळाच्या मागे आहेत असं वाटू शकतात. पण टेलिव्हिजन हे महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत जाणारं माध्यम आहे. त्यामुळे जेव्हा मी बाहेरगावी जाऊन फिरते तेव्हा मला त्या प्रश्नांची उत्तर मिळतात की.. नाही! काळ अजूनही काही ठिकाणी तिथेच थांबलेला आहे. त्या लोकांना त्यांची ती हिरोईन जिंकताना दिसते, रडताना दिसते, त्या रडण्यानंतर पुन्हा ती फाइट करुन जिंकताना दिसते.. ते त्यांच्या जगण्यासाठी आणि त्यांना उमेद देण्यासाठी गरजेचं वाटतं. त्यामुळे मग त्या सगळ्या गरजा ज्याच्या जशा आहेत त्या समजून वागलं जातंय असं वाटतं." अशाप्रकारे तेजश्रीने तिचं मत व्यक्त केलंय.