Join us

प्रीतम, सुनिधी चौहान आणि बादशहाने नव्या अंदाजात गायले राष्ट्रगीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 4:09 PM

एखादे गाजलेले गीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीत सादर झाल्यामुळे नव्या-जुन्या संगीताचा त्यात अप्रतिम संगम झालेला दिसून येतो

ठळक मुद्देप्रीतम, सुनिधी चौहान आणि बादशहा यांनी जगभरातील स्पर्धकांच्या साथीने वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत नव्या स्वरसाजात सादर केले.

भारतीय संगीताला महत्त्व देणाऱ्या ‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमाने जगभरातील भारतीय संगीताच्या चाहत्यांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. लोकप्रिय आणि गाजलेल्या भारतीय गाण्यांचे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादरीकरण करण्याच्या स्पर्धकांमुळे हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी श्रवणीय पर्वणी ठरला आहे. एखादे गाजलेले गीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीत सादर झाल्यामुळे नव्या-जुन्या संगीताचा त्यात अप्रतिम संगम झालेला दिसून येतो. अशाच एका भागात कार्यक्रमाचे परीक्षक प्रीतम, सुनिधी चौहान आणि बादशहा यांनी जगभरातील स्पर्धकांच्या साथीने वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत नव्या स्वरसाजात सादर केले. सर्व भारतीयांमध्ये आणि संगीतप्रेमींमध्ये देशभक्ती आणि भारतीय संगीताबद्दल प्रेम निर्माण व्हावे, हा त्यामागील हेतू होता.

या नव्या चालीतील ‘वंदे मातरम्’वर या तिनही गुणी संगीतकार व गायकांचा ठसा उमटला असून त्यात त्यांना जगभरातून आलेल्या 13 स्पर्धकांचीही साथ लाभली आहे. या गीताचा प्रारंभ सुनिधी चौहानने त्याची पहिली ओळ गाऊन केला. त्यानंतर तिला प्रीतमची साथ लाभली आणि नंतर बादशहाने आपल्या रॅपगीताच्या शैलीत ‘सुजलाम सुफलाम’ ही ओळ गायली. या तिघांच्या चालीला साजेसा ताल जगभरातील स्पर्धकांनी समूहगीत गाऊन धरला होता. या नव्या शैलीतील गीताबद्दल बादशहाने सांगितले, “दिल है हिंदुस्तानीच्या मंचावर ‘वंदे मातरम’ गाताना आम्हाला एक अप्रतिम अनुभव आला आणि राष्ट्रभक्तीची एक सळसळती भावना आमच्या मनात जागृत झाली. या गीताला रॅप शैलीत गाताना मला खूप मजा आली कारण हे नेहमीच्या शैलीतील गीत नव्हते. हे राषट्रगीत रॅपशैलीत गायल्याने माझी नाळ आजच्या तरूण पिढीशी जुळली गेली. माझ्याप्रमाणेच सुनिधी आणि प्रीतमने त्याला आपला स्वत:चा रंग दिला आणि त्यामुळे ते सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचलं.”