Join us

अवली लव्हली कोहली! अन् असा मिळाला 'बिवाली'चा आवाज, प्रियदर्शिनीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:19 PM

प्रियदर्शनीने बिवाली आवाज काढून दाखवला आणि म्हणाली...

लोकप्रिय मराठी कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) मधले सर्वच कलाकार आज स्टार आहेत. त्यांची अफलातून कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवते. त्यांचे छोटे छोटे स्किट्स सोशल मीडियावर व्हायरल असतात. दरम्यान हास्यजत्रेतील 'अवली लव्हली कोहली' चा व्हिडिओ तर तुफान हिट झाला. कोहली फॅमिली भलतीच गाजली. या स्किटमध्ये बिवाली झालेली प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिने नुकताच या कॉमेडी स्किटचा एक किस्सा सांगितला आहे. 

प्रियदर्शिनी सध्या तिचा पहिलाच चित्रपट 'फुलराणी'मुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने ती अनेक मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत प्रियदर्शिनीला बिवाली अवली कोहलीच्या आवाजामागची गंमत काय विचारण्यात आलं. यावर प्रियदर्शनीने बिवाली आवाज काढून दाखवला आणि म्हणाली, 'बिवाली अवली कोहली हे पात्र खरंच खूप व्हायरल झालं. तो आवाज काढायचा हे कसं सुचलं तर याचं सगळं श्रेय मी गोस्वामी सरांना देते. मी खरंतर खालच्या आवाजाच बिवाली अवली कोहली असं म्हणाले होते. माझा आवाज तसा हलका लागला होता. पण सचिन गोस्वामी सरांनी मला दाखवलं आणि मी नंतर तसाच आवाज काढला. तेव्हापासून बिवालीचा हा आवाज ठरला.'

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील 'अवली लव्हली कोहली' या स्किटनंतर त्यावर सोशल मीडियावर गाणंही तयार झालं आणि नंतर ते स्किट गाण्यासोबतच तुफान व्हायरल झालं. हे बघून प्रियदर्शिनी म्हणते, 'ती खरंच क्रेझी डेव्हलपमेंट होती. आता आम्हाला पण डायलॉग घेताना पुढे तेच म्युझिक डोक्यात सुरु होतं.'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे प्रियदर्शिनीला तर लॉटरीच लागली. तिचा नुकताच 'फुलराणी' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिने अभिनेता सुबोध भावेसह मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक केलं जातंय.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारसोशल मीडिया