Join us

प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडियाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मानले आभार, लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 1:40 PM

प्रोड्युसर ऑफ गिल्डने एक ट्वीट करत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देट्वीटमध्ये लिहिले आहे की, नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्याबाबत आम्ही केलेली मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार... यासोबत त्यांनी लिस्ट दिली आहे, त्यात चित्रीकरण सुरू झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी पाळल्या जातील या नमूद केल्या आहेत

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नाहीये. त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून या टप्प्यात काही गोष्टींवरचे निर्बंध कमी करण्यात येतील असे सरकारकडून सांगण्यात आले होते. ग्रीन झोनमधील काही इंडस्ट्री सध्या सुरू करण्यात आल्या असून त्यांना कडक नियम पाळावे लागत आहेत.

मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हे चित्रीकरण सुरू व्हावे यासाठी प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया ही संस्था गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहे. सगळे नियम पाळून आम्ही चित्रीकरण करू असे आश्वासन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिले होते. आता प्रोड्युसर ऑफ गिल्डने एक ट्वीट करत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्याबाबत आम्ही केलेली मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार... यासोबत त्यांनी खाली एक लिस्ट दिली आहे, त्यात चित्रीकरण सुरू झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातील या नमूद केल्या आहेत.

 

चित्रीकरण सुरू झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी चांगल्या दर्जाचे मास्क आणि ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल... सेट, ऑफिसेस वेळोवेळी सॅनिटाईज केले जातील. चित्रीकरणाला उपस्थित असलेल्या लोकांची महिन्यातून एकदा चाचणी केली जाईल. साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना घरून काम करण्याची मुभा मिळेल.  

टॅग्स :उद्धव ठाकरे