अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं ते स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. त्यांची येणारी आगामी मालिका ‘जिवलगा’ ही महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचावी, असे साकडे स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी घातले. ही मालिका २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर स्वप्निल आणि सिद्धार्थ टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे ‘जिवलगा’ ही मालिका दोघांसाठीही खुपच स्पेशल आहे. या मालिकेमध्ये या दोघांबरोबर आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही ‘जिवलगा’ मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
सुपरस्टार कलाकारांचा भरणा असलेल्या ‘जिवलगा’ या अत्यंत महत्वाकांक्षी अशा मालिकेच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसमोर एक आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहे. “जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने ही मालिका सजली आहे.
डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. तर मालिकेची संकल्पना स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे.
‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल.
“जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी प्रेमकथा आहे आणि प्रेक्षकांच्याही ती दीर्घकाळ लक्षात राहील. परस्परसंबंधांची ही कथा असून शेवटी जे योग्य त्याच्या बाजूने ती प्रवास करते. भाषिक दूरचित्रवाहिनीवर अशा प्रकारचे भव्यदिव्य पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ या माध्यमातून सुपरस्टार कलाकार आणि उत्तम कथा असे एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. ही एक उत्तम अशी कथा असून त्यात व्यक्तिरेखांची मानवी कड अनुभवायला मिळेल, असे स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले.
‘स्टार प्रवाह’ने आपल्या स्थापनेपासूनच दर्जेदार मराठी मालिका आणि कार्यक्रम देण्यावर भर ठेवला आहे. ‘जिवलगा’ ही मालिकाही आपलं वेगळेपण नक्कीच अधोरेखित करेल. या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय. तेव्हा पाहायला विसरु नका ‘जिवलगा’ २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.