आपल्याला देखील चित्रपट, मालिकेत झळकता यावे अशी अनेकांची इच्छा असते. पण तुम्हाला माहीत आहे का एका चित्रपट, अथवा मालिकेसाठी हे कलाकार किती मेहनत घेतात. चित्रपटात अथवा मालिकेत कलाकार एखादी भूमिका साकारत असतात. त्यामुळे या भूमिकेप्रमाणे त्यांना अनेकवेळा आपल्यात देखील काही बदल करावे लागतात. काही वेळा कलाकार एखाद्या भूमिकेसाठी कित्येक किलो वजन कमी करतात तर काही वेळा त्यांना कित्येक किलो वजन वाढवावे लागते.
कोणताही कलाकार चित्रपट अथवा मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेशी एकरूप होण्यासाठी त्याच्या अंतरंगातच प्रवेश करतो. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्याला चित्रपट आणि मालिकासृष्टीत पाहायला मिळतात. नामवंत अभिनेता आमिर खान हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे. त्याच्या प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी तो प्रचंड मेहनत घेतो. नवोदित कलाकार देखील आता त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या भूमिकेसाठी काहीही करण्यासाठी तयार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
‘प्यार के पापड’ या ‘स्टार भारत’वर नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेतील आशय मिश्राने ओंकार या भूमिकेसाठी जेव्हा ऑडिशन दिले, तेव्हा त्याला त्याचे वजन घटविण्यास सांगण्यात आले होते. कारण या मालिकेत तो एका बँक कर्मचाऱ्याची भूमिका रंगवणार होता आणि त्यासाठी अतिशय टापटीप कपडे घालणे गरजेचे होते. त्याचा लूक हा कॉर्पोरेटमधील लोकांसारखा असणार असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. ही व्यक्तिरेखा कशी असेल याची पूर्ण कल्पना निर्मात्यांना डोक्यात पक्की होती. त्यामुळे त्याला त्याच्या भूमिकेसाठी जास्त व्यायाम करावा लागला आणि आपल्या आहारावर नियंत्रण आणावे लागले होते. यासंदर्भात आशयने सांगितले, “या भूमिकेसाठी माझी निवड झाल्यानंतर मी प्रचंड खूश झालो होतो आणि या मालिकेत काम करण्यासाठी माझी काहीही करण्याची तयारी होती. त्यासाठी मला कठोर आणि जास्त वेळ व्यायाम करावा लागणार होता. मी त्यासाठी एका प्रशिक्षकाची देखील मदत घेतली आणि काही महिन्यांतच मी भूमिकेसाठी वजन कमी केले.”
‘प्यार के पापड’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांना ‘स्टार भारत’वर पाहायला मिळते.