Join us

गानसम्राज्ञी आशा भोसलेंनी दिला छोट्या सुरवीरांना आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 5:57 PM

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. महाअंतिम सोहळ्याची सुरुवात टॉप ६ स्पर्धकांच्या या रे या या समूह गाण्याने होणार आहे.

ठळक मुद्देआनंद शिंदे यांनी ये देश है संत कबिरोका हे गाणे त्यांच्या अंदाजमध्ये सादर केलेअवधूत गुप्तेने  आर. डी. बर्मन आणि आशाताईची गाणी सादर करून मनं जिंकली.

 ज्या चिमुकल्यांच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले, ज्यांच्या निरागस सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली, ज्यांनी विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून कॅप्टन्स, महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली ते छोटे सुरवीर आता सज्ज आहेत महा अंतिम सोहळ्यासाठी. सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या कार्यक्रमातील सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत केला आणि आता हाच आनंद द्विगुणीत होणार आहे कारण मराठी टेलिव्हीजनवर पहिल्यांदाच महा अंतिम सोहळा दोन भागांमध्ये पार पडणार आहे. पण तरीही दोन्ही भागांमध्ये प्रेक्षकांना तेवढीच मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे हे निश्चित ! सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर - महा अंतिम सोहळा पूर्वाध २७ जानेवारी आणि उत्तरार्ध ३ फेब्रुवारी रोजी संध्या. ७ ते रात्री १०.३० रंगणार आहे. या महा अंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांची स्वप्नपूर्तीच झाली असे म्हणायला हरकत नाही. कारण सुरांच्या सहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांचा आशिर्वाद आपल्या छोट्या सुरवीरांना लाभला हे त्यांचे भाग्यच.

महाअंतिम सोहळ्याची सुरुवात टॉप ६ स्पर्धकांच्या या रे या या समूह गाण्याने होणार आहे. आनंद शिंदे यांनी ये देश है संत कबिरोका हे गाणे त्यांच्या अंदाजमध्ये सादर केले. तसेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अवधूत गुप्तेने  आर. डी. बर्मन आणि आशाताईची निवडक गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या भागामध्ये मॉनिटरची एन्ट्री पालखीतून झाली. हर्षदने सादर केलेल्या एक पोरगी या गाण्याने आणि एकूणच त्याच्या हजरजबाबीपणा, त्याचे निरागस बोलणे, या वयात त्याला असलेली समज याने अवघ्या महाराष्ट्राचे तर मन जिंकलेच होते पण आता खुद्द आशाताई यांनी देखील त्याला सलामी दिली. आपल्या टॉप ६ यांनी देखील एका पेक्षा एक गाणी या पूर्वाधामध्ये सादर केली आहेत. 

टॅग्स :सूर नवा ध्यास नवाआशा भोसलेअवधुत गुप्ते शाल्मली खोलगडेमहेश काळे