जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर या कार्यक्रमात एक प्रशिक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी महान संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे समजते.
या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले, “या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ए. आर. रेहमान यांच्याकडे या कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी विचारणा केली आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा अजून सुरू आहे आणि आम्ही त्यांच्या अधिकृत होकाराची प्रतीक्षा करीत आहोत. रेहमान जर या कार्यक्रमात सहभागी झाले, तर हिंदी सामान्य मनोरंजन वाहिनीवरील कार्यक्रमात ते प्रथमच सहभागी होतील. यापूर्वी जगभर शकिरा, ख्रिस्तिना, अॅडाम लेव्हिन, अशर, मायली सायरस यासारखे आघाडीचे पॉप गायक या कार्यक्रमात प्रशिक्षक या नात्याने सहभागी झाले होते. रेहमान हेही जगभर एक नामवंत संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कार्यक्रमात त्यांच्यासारखी नामवंत व्यक्तीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती नक्कीच सुसंगत ठरेल. या कार्यक्रमातील अन्य प्रशिक्षकांची नावंही अजून निश्चित झालेली नाहीत. भारतातील या कार्यक्रमाचा दर्जाही त्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जासारखाच उच्च ठेवण्यासाठी निर्माते कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत.”जगभरात नावाजलेल्या ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात एक प्रशिक्षक म्हणून जर रेहमान सहभागी झाले, तर तो एक दुर्मिळ योग ठरेल. भारतातील उत्कृष्ट गायकांचा शोध घेण्यासाठी द व्हॉइस या कार्यक्रमात केवळ उत्कृष्ट आवाजाच्या दर्जावरच भिस्त ठेवली जाणार असून त्यात जात-पात, लिंग, धर्म, भाषा, प्रादेशिकता वगैरे कोणतेही भेद केले जाणार नाहीत.