Join us

'अशोक मा.मा.' मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:18 IST

Ashok Ma.Ma. Serial : 'अशोक मा.मा.' मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

कलर्स मराठीवरील लोकप्रिय अशोक मा.मा. (Ashok Ma.Ma. Serial) मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. चंद्रपूरच्या ओवळा गावातून आलेले राधा मामी आणि किशाकाका आता कथेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या या जोडप्यासाठी शहरातले वातावरण नवीन असले तरी त्यांची ठाम विचारसरणी आणि श्रद्धाळूपणा त्यांना वेगळे ठरवतो. विशेष म्हणजे भैरवीच्या तडक-फडक स्वभावाशी त्यांची गाठ पडणार असून यातून अनेक घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. राधा मामींची भूमिका वर्षा दांदळे तर किशाकाकाची भूमिका प्रकाश डोईफोडे साकारणार आहेत. 

प्रियाने केलेल्या नाट्यानंतर भैरवीला राधा मामींनी चांगलेच सुनावले. त्यांच्या दृष्टीने भैरवीने संयमाने आणि मायेने वागले पाहिजे. मात्र, भैरवीच्या तडकफडक वागण्यामुळे दोघींमध्ये ठिणग्या उडाल्या. आता भैरवी राधा मामींना आपली बाजू पटवून देऊ शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वेणूच्या भावाला आणि वहिनीला योग्य पाहुणचार देण्याचे अशोक मामांनी ठरवले असले तरी या सगळ्या गोंधळात ते नेमकी कशी भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भैरवीच्या स्वभावाचा अंदाज त्यांना आहे, मात्र राधा मामींची थोडीशी शिस्तबद्ध आणि कठोर बाजू त्यांच्यासाठी नवीन आहे. 

राधा मामी भैरवीला चांगलेच आव्हान देताना दिसणार आहे. प्रिया आणि अनिशच्या प्रकरणात भैरवी कशी भूमिका घेणार? तिने दिलेली वॉर्निंग प्रत्यक्षात कशी परिणामकारक ठरणार? आणि त्यात राधा मामींच्या शिकवणीचा भैरवीवर काय प्रभाव पडणार? हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळेल.