महाभारताच्या पार्श्वभूमीवर एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेसाठी आतापर्यंत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले यांसारख्या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. ते दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाच्या कथेचे निवेदन करण्यासाठी निर्माते बऱ्याच कलाकारांच्या नावांवर विचार करत होते. अखेरीस त्यांनी यासाठी राधिका आपटेची निवड केली. या मालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेची कथा दमदार असून या मालिकेत कनिष्ठ जातीतील राणी उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. त्यामुळे या कथेच्या पहिल्या भागाच्या निवेदनासाठी कथेला साजेशी दर्जेदार व्यक्ती हवी होती. त्यामुळे मालिकेच्या टीमने राधिका आपटेचा विचार केला. सध्या याबाबत राधिकासोबत बोलणी सुरू असून ती यासाठी होकार देईल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे.
वेब मालिकांमधील आपल्या कसदार अभिनयामुळे सध्या राधिका आपटे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स आणि घोल या तिन्ही सीरिजमध्ये राधिका आपटेची मुख्य भूमिका आहे. या तिन्ही वेबसिरिज प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. यासोबतच तिने पॅडमॅन, बदलापूर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘कर्णसंगिनी’ या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणावर केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, हीसुध्दा या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. आपल्या देखणेपणामुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता गौतम गुलाटी हा या मालिकेत महत्त्वाची भूमिका रंगवणार आहे. या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. त्याचे हवेहवेसे व्यक्तिमत्त्व, सहज वावर आणि देखणेपणामुळे त्याला या मालिकेत दुर्योधनाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे आणि त्याने देखील यासाठी होकार दिलेला आहे.