'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. टीव्हीच्या पडद्यावर नवऱ्याला धडा शिकवताना दमदार फटकेबाजी करणारी राधिका, अर्थात अभिनेत्री अनिता दाते मैदानावरही तेवढीच तुफान बॅटिंग करते. म्हणजे, ती उत्तम क्रिकेट खेळते. मालिकेच्या वेळापत्रकातून सुट्टी मिळाली की क्रिकेट खेळण्यासाठी ती मैदानावर उतरते. अलीकडेच सुट्टीच्या दिवशी एक मॅच खेळताना तिनं जोरदार फलंदाजी केली. क्रिकेट खेळतानाचे आपले फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आपल्या क्रिकेटप्रेमाविषयी बोलताना ती म्हणाली, की ‘लहानपणी भावंडांसोबत मी क्रिकेट खेळले आहे. मध्यंतरी प्रत्येक जिल्ह्याची कलाकारांची एक टीम होती, त्यात नाशिक संघातून मी खेळले होते. त्या संघात माझ्यासोबत अभिजित खांडकेकरही होता. तोही उत्तम क्रिकेट खेळतो. आम्ही नाशिकचे कलाकार प्रॅक्टिस करून खेळायचो. त्याचा मला फायदा होतो आणि खेळताना आणखीन मजा येते.’
अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. तिचे काका उपेंद्र दाते हे रंगभूमीवर प्रचंड प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली.
पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली आहे. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.