‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरू झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट्स आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नवं वळण!
गुरुनाथच्या हलगर्जीपणामुळे ए.एल.एफ. कंपनी देशोधडीला लागली आहे. त्याला शोकॉज नोटीस देऊन देखील कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये काही फारसा फरक पडला नाही आणि त्यामुळेच गुरूच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले होते. ते त्याला चांगलेच धारेवर धरतात. त्यामुळे या सगळ्या काटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो. पण त्याच्या या बोलण्याला न जुमानता त्याचे बॉस त्याला नुकसान भरपाई करण्याची चेतावनी देतात. ए.एल.एफ.च्या ढासळत्या स्थितीमध्ये कंपनीचे सध्याचे भागीदार ए.एल.एफ.चे शेअर्स एखाद्या मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीला विकायचं ठरवतात. त्यासाठी ते तीन कंपनी शॉर्टलिस्ट करतात. त्यातील एक राधिका मसाले ही एक कंपनी आहे. राधिकाला ही ऑफर मिळाल्यावर तिच्याकडे गुरुनाथचा अहंकार ठेचायची एक चांगली संधीच मिळाली आहे. आता राधिका ए.एल.एफ.ची नवीन मालकीण होऊन कशाप्रकारे गुरुनाथ आणि शनायाला तिच्या तालावर नाचवते हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत अभिजीत खांडकेकर गुरुनाथ ही भूमिका साकारत आहे तर शनायाच्या भूमिकेत प्रेक्षकांना रसिका सुनीलला पाहायला मिळत आहे. गुरुनाथच्या पत्नीची म्हणजेच राधिकाची भूमिका अनिता दाते साकारत असून या सगळ्यांच्याच भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेला देण्यात आलेले हे वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.