भारतीय संगीताला महत्त्व देणा-या ‘दिल है हिंदुस्तानी’ या ‘स्टार प्लस’वरील कार्यक्रमाच्या दुस-या सिझनला रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढवली आहे.अतिशय गुणी स्पर्धकांनी आपली सर्वोत्तम कला सादर करण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. सुनिधी चौहान, प्रीतम आणि बादशहा हे परीक्षक आणि राघव जुयाल व मुक्तिमोहन यांच्यातील खटखेबाज संवाद हा रसिकांचे मनोरंजन करीत असतो. ते नेहमी एकमेकांची विनोदी ढंगात टर उडवत असतात.
बादशहाने अलीकडेच एका भागात सूत्रसंचालक राघवला ड्रम वाजविण्याची विनंती केली होती, राघव हा उत्तम डान्स करतो म्हणून मनोरंजन क्षेत्रात प्रसिध्द असला, तरी त्याला संगीताचे काही ज्ञान आहे की नाही, याची फारशी कुणाला माहिती नाही. कॉलेजमध्ये असताना राघवच्या वर्गातच शिकणारा संकल्प खेतवाल हा या कार्यक्रमात एक स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात या दोघांनी एका संगीत बॅण्डमध्ये एकत्र वाद्ये वाजविली होती. त्यांच्या या ग्रुपमध्ये केवळ संकल्पलाच वाद्ये वाजविण्याचे ज्ञान होते, त्यामुळे त्यांचा हा वाद्यमेळ धमाल मजेशीर झाला होता. त्याच्याकडून हा किस्सा ऐकल्यावर बादशहाने राघवला ड्रम वाजविण्याची विनंती केली.
पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना राघवने सांगितले, ''संकल्पबरोबर पुन्हा एकदा मंचावर वाद्य वाजविण्याच्या कल्पनेनेच मी खुश झालो होतो.कॉलेजमध्ये मला संगीताचं काहीही ज्ञान नव्हतं, पण मला कसंही करून स्टेजवर राहायचं होतं. पण आताच्या वेळेला तर माझी अवस्था पूर्वीपेक्षाही वाईट होती आणि सारे परीक्षक माझ्यावर हसत होते. पण पुन्हा जेव्हा आम्ही एकत्र असू, तेव्हा मी बादशहाला ड्रम्स वाजून दाखवीन, असं आश्वासन मी त्याला दिलं असल्याचे राघवने सांगितले.”
लोकप्रिय आणि गाजलेल्या भारतीय गाण्यांचे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादरीकरण करण्याच्या स्पर्धकांमुळे हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी श्रवणीय पर्वणी ठरला आहे. एखादे गाजलेले गीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीत सादर झाल्यामुळे नव्या-जुन्या संगीताचा त्यात अप्रतिम संगम झालेला दिसून येतो. अशाच एका भागात कार्यक्रमाचे परीक्षक प्रीतम, सुनिधी चौहान आणि बादशहा यांनी जगभरातील स्पर्धकांच्या साथीने वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत नव्या स्वरसाजात सादर केले. सर्व भारतीयांमध्ये आणि संगीतप्रेमींमध्ये देशभक्ती आणि भारतीय संगीताबद्दल प्रेम निर्माण व्हावे, हा त्यामागील हेतू होता.