समीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का? अभिनेता राहुल भटचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 06:02 PM2020-08-07T18:02:45+5:302020-08-07T18:04:56+5:30
राहुल भटने ट्वीट करत, समीरच्या आत्महत्येकडे लक्ष वेधले.
काल गुरुवारी टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता समीर शर्माच्या आत्महत्येची बातमी समोर आली आणि सर्वत्र खळबळ उडाली. 44 वर्षांच्या समीर शर्माचा मृतदेह त्याच्याच घराच्या किचनमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समीरच्या मृत्यूवर अनेक सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त केले. मात्र अभिनेता राहुल भट याने मात्र अशी पोस्ट केली की, त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समीर शर्माच्या मृत्यूवर सगळेच गप्प का? असा खरमरीत सवाल त्याने केला.
राहुल भटने ट्वीट करत, समीरच्या आत्महत्येकडे लक्ष वेधले.
Sameer sharma committed suicide but not many people talk about him , no talk of #Nepotism ?no talk of is it a suicide or murder ? No talk of various issues around an actor . Why ??? Why ?? Not big enough ? So not worthy of politics ?? Not interesting enough for news channels?
— Rahul Bhat (@itsRahulBhat) August 6, 2020
‘समीर शर्माने आत्महत्या केली, पण त्याच्याबद्दल फार कुणी बोलताना दिसले नाही. नेपोटिजमवर चर्चा नाही? आत्महत्या वा हत्येचा आरोप नाही? त्याच्या संबंधित मुद्यांवरही चर्चा नाही? का? का? तो इतका मोठा स्टार नव्हता की तो राजकीय मुद्दा बनण्याच्या लायकीचा नाही? न्यूज चॅनलसाठी त्याच्यात काही स्वारस्य नाही?’ असे खोचक प्रश्न राहुल भटने उपस्थित केले.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर नेटक-यांपासून राजकारण्यांपर्यंत सगळेच बोलताना दिसत आहेत. मात्र समीर शर्माच्या मृत्यूवर कोणी एक शब्दही बोलायला तयार नाही, असा अप्रत्यक्ष सवाल राहुल भटने या ट्वीट मधून केला आहे.
समीर शर्माने ये रिश्ते है प्यार के, कहानी घर घर की, लेफ्ट राइट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दूं अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते.
घराच्या किचनमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घरातून दुर्गंधी यायला लागल्याने शेजा-यांना संशय आला आणि यानंतर समीरने आत्महत्या केल्याचे समोर आले. समीरने मृत्यूपूर्वी कुठलीही सुसाईड नोट मागे सोडलेली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या कारणांचा खुलासा झालेला नाही. पण समीर नैराश्यात होता, याचे संकेत मात्र त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिले होते. 27 जुलैला समीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यावरून तो एकाकी होता, नैराश्यात होता, असे जावणते. या पोस्टमध्ये त्याने मृत्यूचे संकेत दिले होते. ‘मी माझी चिता रचली आहे आणि त्यावर झोपलोय. माझ्या आगीने ती जळतेय,’ अशा ओळी लिहिलेला फोटो त्याने पोस्ट केला होता.
समीर विवाहित होता. मात्र पत्नीपासून वेगळा राहत होता. त्याचे लग्न अचला शर्मासोबत झाले होते. काही काळापासून दोघे वेगळे राहत होते. समीर मूळचा दिल्लीचा होता.