Join us

अभिनयासाठी 'या' मराठी अभिनेत्याने सोडली बहरिनची नोकरी; आर्किटेक्ट म्हणून केलं विदेशात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 1:57 PM

Marathi actor: त्यांनी विदेशातही नाटक बसवलं होतं. मात्र, अभिनयाचं प्रेम त्यांना देशात पुन्हा घेऊन आलं.

मराठी कलाविश्वात असे असंख्य कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाच्या प्रेमापोटी त्यांच्या चांगल्या नोकरी, व्यवसायावर पाणी सोडलं आहे. यात खासकरुन मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या सरकारी नोकऱ्या सोडून अभिनयाची वाट धरली आहे. यात सध्या श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील राजन भिसे हे चर्चेत आले आहेत. राजन भिसे यांनी चक्क विदेशातील नोकरी सोडली आणि अभिनयाची वाट धरली.

श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत शेखर ही महत्त्वाची भूमिका साकारुन राजन भिसे विशेष लोकप्रिय झाले. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका केल्या. परंतु, गंगाधर टिपरे मालिकेतील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे अभिनयासाठी त्यांनी त्यांची मोठ्या पगाराची नोकरीदेखील सोडली. एका मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्य केलं.

शालेय शिक्षण झाल्यानंतर राजन भिसे यांनी आर्किटेक्चरच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. यात शिक्षणामुळे काही काळ त्याचा अभिनय मागे पडला. अभ्यासाठी त्यांना नाटकांपासून दूर रहावं लागलं. यानंतर आर्किटेक्चरचं शिक्षण घेतल्यानंतर ते बहरिनला नोकरीनिमित्ताने गेले. विशेष म्हणजे येथे त्यांना त्यांच्या अभिनयाची आवड जोपासता आली.

बहरिनमध्ये त्यांच्यासारखेच अनेक भारतीय आहेत. त्यामुळे तेथे राहत असलेल्या भारतीयांच्या मदतीने त्यांनी पहिल्यांदा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. या गणेशोत्सवात त्यांनी काका किश्याचा हे नाटकही बसवलं. त्यांच्या या नाटकाचं स्थानिक आणि भारतीय राजदूतांकडून विशेष कौतुकही करण्यात आलं. मात्र, त्यांच्यातील अभिनेता त्यांना स्वस्त बसू देईना ज्यामुळे त्यांनी भारतात यायचा निर्णय घेतला.

१९८७ साली राजन भिसे भारतात परत आले. मायदेशी परतल्यानंतर त्यांनी पुन्हा नाटक करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यातूनच मग पुढे मालिका, जाहिरातीही ते करु लागले. नाटकं सुरु असतानाच त्यांना श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेची ऑफर मिळाली.

अशी झाली श्रीयुत गंगाधर टिपरे मध्ये एन्ट्री

अभिनय असण्यासोबतच राजन भिसे नाटकांसाठी नेपथ्य डिझाइनचंही काम करत होते. या काळात केदार शिंदेच्या 'तू तू मी मी' या नाटकाचा त्यांनी सेट तयार केला. त्यावेळी ‘मला तुझ्या नाटकात अभिनय करायचा आहे.' हे राजन यांनी केदारला सांगितलं होतं. हे लक्षात ठेऊन केदार शिंदे यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेसाठी राजन यांना ऑफर दिली. आणि, त्यांनीही लगेच या भूमिकेसाठी होकार दिला.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा