Raju Shrivastav Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) गेल्या आठ दिवसांपासून रूग्णालयात आहेत. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून राजू बेशुद्ध आहेत. आता त्यांची प्रकृती आधीपेक्षा खराब असून मेंदू जवळपास ‘डेड’ अवस्थेत पोहोचला आहे. आता सगळं काही परमेश्वराच्या हातात असल्याचं त्यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी म्हटलं आहे.
आता काही चमत्कार झाला तरच...एम्समध्ये भरती असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती चाहत्यांची चिंता वाढवणारी आहे. त्याचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, आज सकाळी डॉक्टरांनी माहिती दिली, त्यानुसार त्यांचा मेंदू काम करत नाहीये. तो जवळपास डेड स्थितीत आहे. हार्टमध्येही समस्या आहेत. आम्ही सगळे चिंतीत आहोत. सर्वजण परमेश्वराला प्रार्थना करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील लोकही स्तब्ध आहेत.
गेल्या 10 ऑगस्टला जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव अचानक हृदयविकाराचा झटका आला हरेता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं हरेतं. 10 ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र हृदयविकाराचा झटका आल्यापासून राजू हे अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना हलका तापसुद्धा होता. त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे.
राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.