लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी जवळपास 42 दिवस मृत्यूशी झुंज दिली. यादरम्यान मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राजू व त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला. राजू श्रीवास्तव आज या जगात नाहीत. पण त्यांच्या कुटुंबीयांकडे अमिताभ यांचे आभार मानायला शब्द नाहीत. राजू श्रीवास्तव यांची लेक अंतरा ( Antara) हिने अमिताभ यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
राजू श्रीवास्तव बिग बींना ‘गुरू’ मानायचे. अगदी त्यांच्या मोबाईलमध्येही अमिताभ यांचा नंबर ‘गुरू जी’ नावाने सेव्ह होता. राजू श्रीवास्तच दिल्लीच्या एम्स रूग्णालयात व्हेंटिलेटरवर निपचिप पडले असताना त्यांना अमिताभ बच्चन यांचं रेकॉर्डिंग ऐकवलं गेलं होतं. राजू यांच्या कुटुंबीयांनी त्यांची प्रकृती सुधारावी, ते शुद्धीवर यावेत यासाठी अमिताभ यांना रेकॉर्ड केलेला संदेश पाठवण्याची विनंती केली होती. यानंतर लगेच अमिताभ यांनी रेकॉर्ड संदेश पाठवला होता. अमिताभ यांचा आवाज ऐकून राजू यांचे एकदा डोळेही उघडले. पण नंतर त्यांनी ते पुन्हा मिटले ते मिटलेच. 42 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू यांची अखेर प्राणज्योत मालवली.
राजू यांच्या निधनानंतर त्यांची लेक अंतरा हिने अमिताभ यांच्या नावे एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने अमिताभ यांचे आभार मानले आहेत. अंतराने लिहिलं, ‘मी अंकल अमिताभ बच्चन यांचे आभार मानू इच्छिते. कठीण प्रसंगात ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. तुमच्या प्रार्थना व प्रेमाने आम्हाला मोठी ताकद दिली. आम्ही आयुष्यभर हे विसरणार नाही. तुम्ही माझ्या पित्याचे आदर्श होता. त्यांची प्रेरणा, त्यांचे गुरू होता. जेव्हा पापांनी तुम्हाला पहिल्यांदा स्क्रिनवर बघितलं तेव्हापासून तुम्ही कायम पापांसोबत राहिलात. पापा तुम्हाला ऑन स्क्रिनच नाही तर ऑफ स्क्रिनही फॉलो करायचे. त्यांनी तुमचा नंबर गुरूजी नावानं सेव्ह केला होता. तुमची ऑडिओ क्लिप ऐकून पापांनी रिअॅक्ट केलं होतं. यावरून तुम्ही त्यांच्यासाठी काय होता, हे कळतं. माझी आई शिखा, भाऊ आयुष्यमान व मी तुमचे आभारी आहोत. जगभर माझ्या वडिलांना जे प्रेम, जो आदर मिळाला, तो सर्व तुमच्यामुळे आहे. खूप खूप आभार अंकल...’
10 ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीच्या एका जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडली होती. ते ट्रेड मिलवरच कोसळले होते. बेशुद्धावस्थेत त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. तेव्हापासून राजू व्हेंटिलेटरवर होते. 21 सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं.