प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्या प्रकृतीमध्ये अद्यापही कोणती सुधारणा झालेली नाही. काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून आज जवळपास १० ते १२ दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कालावधीत त्यांच्या प्रकृतीविषयीचे अनेक अपडेट्स, अफवा समोर आल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. यामध्येच आता त्यांच्या मेंदूतील एक नस पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं सांगण्यात येत आहे. 'आज तक'ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. राजू यांच्या मेंदूची नस ब्लॉक झाल्यामुळे ते कोमात गेले आहेत. इतकंच नाही तर न्यूरोफिजियोथेरेपीच्या (Neurophysiotherapy) मदतीने त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी त्यांना अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील डायलॉग्स ऐकवण्यात येत असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.दरम्यान, १० ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. इतकंच नाही तर त्यांना शुद्धीवर येण्यासाठी अजून २ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, असंही सांगण्यात आलं आहे.