प्रसिद्ध कमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मागील बुधवारी वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे सतत सांगितले जात होते. त्यामुळे त्यांचे चाहते आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. अशातच आता त्यांच्या तब्येतीबद्दल दिलासादायक माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा होते आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजू श्रीवास्तव आता उपचाराला प्रतिसाद देत आहे. पहिल्यापेक्षा राजू श्रीवास्तव यांच्या शरीरातील अवयवही पूर्ण क्षमतेने काम करताहेत. रुग्णालयात दाखल केले तेव्हा राजू श्रीवास्तव यांना २०% ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते, आता ते १०% ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.
राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूच्या एका भागात काही स्पॉट आढळले आहेत. ते काढण्यासाठी उपचार सुरू करण्यात आले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदुत आढळलेले स्पॉट कोणत्याही दुखापतीमुळे झालेले नाहीत, हेदेखील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, त्यांच्या मेंदूच्या एका भागाला सुमारे २० मिनिटं ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही, ज्यामुळे त्यांना शुद्धीवर येण्यासाठी त्रास होत आहे. राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर येण्यासाठी किमान आठवडा किंवा त्याहून जास्त वेळ लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.