Join us

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 8:19 AM

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.

Raju Srivastava Health Update : सगळ्यांना खळखळून हसवणारे दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव ( Raju Srivastav) यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. सकाळी जीममध्ये वर्कआऊट करत असताना ते ट्रेडमिलवरच कोसळले. त्यानंतर त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं सुरूवातीला त्यांना इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. परंतु नंतर त्यांना सीसीयूमध्ये हलवण्यात आलं.

जीममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एंन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एन्जिओग्राफिमध्ये एका ठिकाणी १०० टक्के ब्लॉक सापडल्याचं सांगण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कॉमेडियन सुनील पाल यांनं एन्स्टाग्रामवर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक व्हिडीओ शेअर केला. तसंच त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असं त्याने व्हिडीओत म्हटलं आहे. राजू श्रीवास्तव कॉमेडीचे बादशाह मानले जातात. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचं होते आणि त्यांनी हे स्वप्न पूर्णही केलं. राजू यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली.

टॅग्स :राजू श्रीवास्तवएम्स रुग्णालयहृदयविकाराचा झटका