Join us

Arun Govil Birthday : ‘टीव्ही’चे ‘राम’ अरूण गोविल यांच्याकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती..!  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:44 AM

Arun Govil Birthday : . टीव्हीवर ‘रामायण’ ही मालिका लागली की भारतभर अघोषित कर्फ्यु असल्यासारखे रस्ते सुनसान पडायचे. राम सीता झालेल्या कलाकारांच्या लोक पाया पडायचे.  या मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती.

80 च्या दशकात आलेल्या ‘रामायण’  (Ramayan) या मालिकेइतकी लोकप्रियता खचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. टीव्हीवर ही मालिका लागली की, भारतभर अघोषित कर्फ्यु असल्यासारखे रस्ते सुनसान पडायचे. राम सीता झालेल्या कलाकारांच्या लोक पाया पडायचे.  या मालिकेत अरुण गोविल  (Arun Govil) यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका इतकी अफाट गाजली होती की, लोक घरामध्ये चक्क प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो लावू लागले होते. आज याच अरूण गोविल यांचा वाढदिवस.

12 जानेवारी 1958 रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे अरूण गोविल यांचा जन्म झाला. अरूण गोविल यांना खरं तर इंजिनिअर व्हायचं होतं. पण नियतीनं कदाचित आणखीच काही लिहून ठेवलं होतं.

1975 साली भावाच्या बिझनेसमध्ये मदत करण्याच्या इराद्याने अरूण गोविल मुंबईत आले होते. वय होतं 17 वर्ष.  काही दिवस भावासोबत काम केल्यानंतर अरूण यांना त्या कामाचा कंटाळा येऊ लागला. कॉलेज दिवसांत अनेक नाटकांत काम केलं होतं. ती मजा या कामात नव्हती. अरूण यांना अभिनयाची दुनिया खुणावू लागली होती. अखेर त्यांनी या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

अरूण गोविल यांचा मोठा भाऊ विजय गोविल यांनी अभिनेत्री तब्बसुमशी लग्न केलं होतं. मग काय, वहिनींनीच अरूण गोविल यांची ताराचंद बडजात्यांशी भेट घालून दिली. या पहिल्या भेटीत बडजात्या इतके प्रभावित झाले की, त्यांनी अरूण गोविल यांच्यासोबत 3 चित्रपटांची डील साई केली. 

1977 साली ‘पहेली’ या चित्रपटातून अरूण गोविल यांचा डेब्यू झाला. बडजात्यांनी तीन सिनेमांची डील साईन केली होतीच. त्यातील पहिला सिनेमा होता, ‘सावन को आने दो’. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि अरूण गोविल स्टार झाले. 1981 मध्ये आलेला त्यांचा ‘जिओ तो ऐसे जिओ’ हा सिनेमाही हिट झाला.अरूण गोविल यांचं फिल्मी करिअर सुरू असताना 80 च्या दशकात ते छोट्या पडद्याकडे वळले.

अशी मिळाली रामाची भूमिकारामानंद सागर रामायण बनवत आहेत, असं कळल्यावर अरूण गोविल रामाची भूमिका मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. होय, अरूण गोविल यांनी ‘कपिल शर्मा शो’मध्ये याबद्दल सांगितलं होतं. ‘ रामानंद सागर  रामायण  बनवणार हे ऐकताच मी त्यांच्याकडे गेलो. मला रामाची भूमिका हवी, असं मी त्यांना म्हणालो. माझे शब्द ऐकून त्यांनी मला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि ठीक आहे, वेळ आली तेव्हा पाहू, म्हणून मला परत पाठवलं. आता काही चान्स नाही म्हणून मी घरी परतलो. पण एकदिवस त्यांचा कॉल आला, त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं.  पण ऑडिशनमध्ये मला रिजेक्ट केलं गेलं. यामुळे मी चांगलाच निराश झालो होतो. परंतु कदाचित राम बनणं माझ्याच नशिबात असावं. एकदिवस रामानंद सागर यांचा पुन्हा फोन आला. मला त्यांनी भेटायला बोलवलं. मी त्यांच्या घरी गेलो आणि मला आनंदाची बातमी मिळाली. माझ्या टीमला तुझ्यासारखा राम मिळत नाहीये, तेव्हा तूच राम होणार, असे रामानंद सागर यांनी मला सांगितलं आणि मला रामाची भूमिका मिळाली,’ असं त्यांनी सांगितलं होतं.

‘रामायण’ने मला अफाट लोकप्रियता दिली, पण...!रामायण  या मालिकेने अरूण गोविल यांना अफाट लोकप्रियता दिली मात्र त्यांचं बॉलिवूडमधील करिअर मात्र या मालिकेसोबतच संपलं. कारण या मालिकेनंतर कोणताही निर्माता त्यांना काम देईना.  रामाची भूमिका साकारल्याने तुमची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. ही प्रतिमा खूपच प्रभावी आहे, ती खोडून आम्ही  तुम्हाला सहाय्यक अभिनेत्याची किंवा इतर लहान-मोठ्या भूमिका देऊ शकत नाही, असं निर्माते त्यांना  तोंडावर सांगत.

इतक्या कोटींची संपत्तीअभिनयात मिळालेल्या अपयशानंतर अरूण गोविल निर्मिती क्षेत्राकडे वळले.   रामायण या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिडी यांच्यासोबत त्यांनी प्रोडक्शन हाऊस सुरू केले. त्यांचं प्रोडक्शन हाऊस दूरदर्शनवरील मालिकांची निर्मिती करतं. विविध पोर्टलनुसार, अरूण गोविल 38 कोटींपेक्षा अधिकच्या संपत्तीचे मालक आहेत.

अरुण गोविल यांची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे. त्यांनी श्रीलेखा यांच्यासोबत लग्न केलं असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी एका प्रसिद्ध कंपनीत कामाला आहे. त्यांचा मुलगा देखील अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे. 

टॅग्स :रामायणटेलिव्हिजन