लोकप्रिय टीव्ही अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) हे देखील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी त्रिवेणी संगममध्ये शाही स्नान केलं. 'रामायण' मालिकेतील प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतून त्यांनी सर्वांवरच छाप पाडली होती. त्यांनाच लोक श्रीराम समजत त्यांच्या पायाही पडायचे इतकं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. अरुण गोविल यांचे महाकुंभमधील फोटो समोर आले आहेत.
महाकुंभमध्ये यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत शाही स्नान केलं. अरुण गोविल भगव्या रंगाचा कुर्ता घालून पोहोचले होते. देवाचं नामस्मरण करत त्यांनी पवित्र स्नान केलं. याचे फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले, "सनातम संस्कृतीचा महोत्सव, आस्थेचा महायज्ञ, एकता, समता, धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा यांचं प्रतीक तथा राष्ट्रीय एकतेला समर्पित विश्वातील सर्वात मोठा महासंगम महाकुंभ २०२५, प्रयागराजमध्ये आज पवित्र त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याचं सौभाग्य प्राप्त झालं. गंगा, यमुना आणि माँ सरस्वती सगळ्यांचं कल्याण करो."
'महाकुंभ'ची दिव्यता दाखवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार अनेक प्रयत्न करत आहे. १४ जानेवारी ते २५ एप्रिल पर्यंत महाकुंभचं आयोजन करण्यात आलं आहे. देश-परदेशातून अनेक भाविक याठिकाणी येत आहेत. येथील सुविधाही आधुनिक आहे. दिग्गज व्यक्तिमत्वांची आणि नेत्यांची उपस्थिती यंदा महाकुंभची शोभा वाढवत आहे.