सध्या सर्वत्र अयोध्येत पार पडणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकही उत्सुक आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यासाठी त्यांना आमंत्रणही दिलं गेलं आहे. 'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या अरुण गोविल यांनाही राम मंदिर प्रतिष्ठापणेचं आमंत्रण मिळालं आहे.
राम मंदिर प्रतिष्ठापनेचं आमंत्रण मिळाल्यानंतर अरुण गोविल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ते म्हणाले, "राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं आमंत्रण मिळालं, याचा मला आनंद आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आणि प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी मी उत्सुक आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मला वाटतं की आपण याचं श्रेय मोदींना कोणाला द्यायला हवं. त्यांनी ज्याप्रकारे काम केलं आहे. त्यामुळे सगळीकडे ऊर्जा निर्माण झाली आहे. ते कौतुकास पात्र आहेत."
"याप्रकारचं काम एका व्यक्तीकडून होत नाही, असंदेखील मला वाटतं. पण, मोदींमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. सगळ्यांनी कित्येक वर्षांपासून यासाठी काम केलं आहे. अनेकांनी यासाठी बलिदान दिलं आहे. काही जण अजूनही आपलं योगदान देत आहेत," असंही पुढे ते म्हणाले. अरुण गोविल यांच्याबरोबरच दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांनाही राम मंदिरी प्राणप्रतिष्ठापनेचं आमंत्रण मिळालं आहे.