‘रामायण’ (Ramayan) या अफाट लोकप्रिय झालेल्या मालिकेत प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल (Arun Govil) आज इतक्या वर्षानंतरही रामाच्या प्रतिमेतून बाहेर पडलेले नाहीत. अगदी इतक्या वर्षानंतरही लोक त्यांना पाहून हात जोडतात, त्यांच्या पाया पडतात. विमानतळावर याचा नुकताच प्रत्यय आला. अरूण गोविल दिसले आणि एक महिला भावुक झाली. इतकी की, तिने चक्क अरूण गोविल यांच्यापुढे लोटांगण घालत त्यांचे चरणस्पर्श केलेत. सध्या एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
अरूण गोविल महाराष्ट्राच्या संभाजीनगर रामलीला कार्यक्रमासाठी आले होते. ते एअरपोर्टवर असताना अनेक चाहत्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. एक महिला अरूण गोविल यांना पाहून प्रचंड भावुक झाली. साक्षात राम भेटल्याचा साक्षात्कार जणू तिला झाला. मग काय, विमानतळावरच ती अरूण गोविल यांच्या पाया पडली. अरूण गोविलही या अनपेक्षित घटनेमुळे चकीत झालेत. त्यांनी या महिलेला प्रेमाने उठवले आणि हात जोडून नमस्कार केला.
80 च्या दशकात आलेल्या ‘रामायण’ या मालिकेइतकी लोकप्रियता खचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. मालिकेतील कलाकारांना आजही अनेक लोक देवासारखे मानतात. या मालिकेत अरूण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ही भूमिका इतकी अफाट गाजली की, लोक चक्क घरामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो लावू लागले होते़ आजही अरूण गोविल यांच्या लोक पाया पडतात, एकंदर काय तर या मालिकेने अरूण गोविल यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पण सोबत त्यांचा एक तोटाही केला. होय, खुद्द अरूण गोविल यांनी एका ताज्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
‘गेल्या 14 वर्षांत मी चित्रपट किंवा मालिका केल्या नाहीत. काही कार्यक्रमात विशेष पाहुण्याच्या भूमिकेत मी दिसलो पण यापलिकडे मी काहीच केलं नाही. या मालिकेने मला लोकप्रियता दिली मात्र माझे बॉलिवूडमधील करिअर मात्र या मालिकेसोबतच संपले. कारण या मालिकेनंतर कोणताही निमार्ता मला काम देईना,’ अशी खंत अलीकडे एका मुलाखतीत अरूण गोविल यांनी बोलून दाखवली होती.