अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितील २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अनेक सेलिब्रिटींनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 'रामायण' मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारलेले कलाकार अयोध्येत दाखल झाले आहेत. अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हजेरी लावणार आहेत. पण, राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत गेलेल्या लक्ष्मणाला मात्र अयोध्येत अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.
९०च्या दशकात गाजलेला 'रामायण' हा टीव्ही शो आजही तितकाच लोकप्रिय आहे. या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारून अरुण गोविल आणि सीता मातेच्या भूमिकेत असलेल्या दीपिका चिखलिया यांना लोकप्रियता मिळाली. याच मालिकेत लक्ष्मण ही भूमिका साकारून सुनील लहरी घराघरात पोहोचले. नुकतंच त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या गाठलं. पण, इथे त्यांना राहण्यासाठी हॉटेल रुमच मिळत नसल्याचं समोर आलं आहे.
याबाबत 'आजतक'शी संवाद साधताना सुनील लहरी म्हणाले, "अयोध्येत मी दोन वर्षांपूर्वी शूटिंगसाठी आलो होतो. पण, हे तेच शहर आहे यावर माझा विश्वास बसत नाहीये. हे शहर खूप बदललं आहे. या शहरातील हवेतही एनर्जी जाणवत आहे. शहरात सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे. पण, इथे मला हॉटेलमध्ये रुम मिळवण्यासाठी अडचण येत आहे. इथल्या सगळ्या हॉटेलचं बुकिंग झालं आहे. हॉटेलमध्ये एकही रुम रिकामी मिळत नाहीये. रुम मिळाली नाही तर माझं दर्शनही होणार नाही. पण, श्रीरामाने बोलवलं आहे. तर नक्कीच रुमची व्यवस्थाही होईल."