Join us

‘रामायण’च्या सीतेला साकारायचीय निर्भयाच्या आईची भूमिका, खास कारण आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:44 AM

‘रामायण’ आणि या मालिकेतील स्टारकास्ट सध्या जाम चर्चेत आहे. 

 रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ आणि या मालिकेतील स्टारकास्ट सध्या जाम चर्चेत आहे. विशेषत: रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल आणि माता सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया या नावांची तर जोरदार चर्चा आहे. दीपिका सध्या मनोरंजन विश्वात फार अ‍ॅक्टिव्ह नाहीत. पण हो संधी मिळाली तर कुठली भूमिका साकारायला आवडेल, हे मात्र त्यांच्या मनात पक्के झाले आहे. होय, संधी मिळाली तर निर्भयाच्या आईची भूमिका साकारायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

नवभारत टाइम्सला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत त्या यावर बोलल्या़ निर्भयाच्याच आईची भूमिका का, याचे सविस्तर उत्तर त्यांनी दिले. निर्भया प्रकरण जगासमोर आले, त्यादिवसांपासून मी अस्वस्थ आहे. या प्रकरणाबद्दल विचार करते तेव्हा भीतीने अंगावर काटा येतो. एक स्त्री, एक आई या नात्याने निर्भयाच्या आईची वेदना, त्यांना झालेला त्रास मी समजू शकते. या माऊलीला आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल सात वर्षे लागलीत. या सात वर्षांत त्यांच्या मनाची अवस्था मी जाणते. त्या ज्या धीराने, ज्या खंबीरपणे न्यायासाठी लढल्या, ते प्रेरणादायी आहे. या प्रकरणावर चित्रपट निघालाच आणि मला संधी मिळाली तर निर्भयाच्या आईची ही वेदना, त्यांचा संघर्ष पडद्यावर जिवंत करायला मला आवडेल.

दीपिका पुढे म्हणाल्या, आजही गावातल्या महिला मुकाट्याने अन्याय सहन करतात.  तक्रार करायला घाबरतात. त्यांना निर्भया आणि तिच्या आईची कहाणी प्रेरणा देऊ शकते. ही केस बराच काळ चालली. त्यामुळे यावर एखादा सिनेमा तयार झाला तर यातून लोकांमध्ये नक्कीच जागरुकता येईल. खास करुन महिलांना यातून हिम्मत मिळेल.

टॅग्स :रामायण