टीआरपीच्या शर्यतीत सलग १५ आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिलेली 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla ) ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, मालिकेचं कथानक १४ वर्षांनी पुढे सरकलं आहे. साक्षीच्या मृत्यूप्रकरणी १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगून कार्तिक तुरुंगाबाहेर येणार आहे. दीपिका व कार्तिकी या मुली मोठ्या झाल्या आहेत. तूर्तास मालिकेचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. पण हा प्रोमो पाहून अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.प्रोमोत १४ वर्षानंतर कार्तिक तुरुंगातून बाहेर येताना दिसतोय. दीपाला पाहून कार्तिकच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. मोठ्या झालेल्या दोन्ही मुलींना पाहून कार्तिक आणखीच भावुक होतो. दीपाचेही डोळे पाणावतात. कार्तिक दीपाला मिठी मारतो. पण आता दीपाचा वनवास सुरू होणार आहे. प्रोमो जबरदस्त आहे. पण प्रेक्षकांना मात्र हा प्रोमो फारसा आवडला नसल्याचं दिसतंय. प्रोमोतील चुकांवर प्रेक्षकांनी नेमकं बोट ठेवलं आहे.
१४ वर्ष उलटली, मुली मोठ्या झाल्या. पण दीपा आणि कार्तिक आत्ताही पूर्वीसारखेच कसे दिसत आहेत असा प्रश्न प्रेक्षकांना उपस्थित केला आहे. अनेकांनी यावरून मालिकेची खिल्ली उडवली आहे. “दीपा आणि कार्तिक अमर रहे...मुली 21 वर्षाच्या झाल्या तरी दीपा एकदम फिट...अजब गजब आहे सगळं,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.
“हे लोक प्रेक्षकांना मूर्ख समजतात का. त्या दीपाला किती बावळट दाखवले आहे. डोळे झाकून स्वत:च्या बहिणीने केलेले गुन्हे माफ केले आणि चूक नसलेल्या नवऱ्याला १४ वर्षे जेलमध्ये पाठवले. काहीही दाखवतात. मनोरंजनाच्या नावाखाली नुसती नकारात्मकता पसरवली जात आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. “माहित नाही काय खाऊन स्टोरी लिहितात,” अशी कमेंटही कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतेय. “अवघड आहे या मालिकेचं, साक्षीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? त्यामागे नक्की कोणाचा हात आहे ? हे सगळं गेलं शिमगा करायला, आणि आता हे वेगळंच, मालिकेच्या कथानकाला, आणि रंग माझा वेगळाला भावपूर्ण श्रद्धांजली...RIP,” असं एका युजरने लिहिलं आहे. काय मस्करी आहे राव, अशी कमेंट एका युजरने केली आहे.