Join us

राकेश बापटची प्रकृती बिघडली, दुबईतील आयसीयूमध्ये उपचार सुरु; म्हणाला, 'प्रार्थना...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 11:39 AM

Video पोस्ट करत दिली माहिती

टीव्ही अभिनेता राकेश बापटने (Raqesh Bapat) कालच रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली होती. यामुळे चाहते चिंतेत होते. मात्र नक्की झालंय काय हे त्याने स्पष्ट केले होते. आता राकेशने इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये त्याने संपूर्ण माहिती शेअर केली आहे. राकेश दुबईत शूटसाठी गेला असून तिथेच त्याला थेट आयसीयूत(ICU)मध्ये भरती व्हावं लागलं आहे.

राकेशने कालच इन्स्टाग्रामवर हाताला सलाईन लावलेला एक व्हिडिओ स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. मात्र त्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता. तसंच त्याने नक्की काय झालंय ही माहिती देखील दिली नव्हती. आता चाहत्यांची माफी मागत त्याने एक व्हिडिओ स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. राकेश म्हणाला, 'हॅलो काल काही न सांगिल्याबद्दल मी माफी मागतो. मी दुबईत शूट करत आहे. इथल्या उष्णतेमुळे माझी तब्येत प्रचंड खालावली. उष्माघात, ताप आणि रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. मी इथे चांगल्या रुग्णालयात असून आयसीयूमध्ये आहे.लवकरच कामाला सुरुवात करेल अशी आशा आहे. तुम्ही करत असलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल खूप आभार. माझ्यासाठी प्रार्थना करा आणि स्वत:चीही काळजी घ्या.'

राकेशची तब्येत आता हळूहळू सुधारत आहे. बिग बॉस ओटीटी च्या पहिल्याच सिझनमध्ये राकेश सहभागी झाला होता. शोमध्ये त्याचं आणि शमिता शेट्टीचं अफेअर चर्चेत आलं होतं. घरातून बाहेर आल्यावरही काही काळ दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. राकेशने 'होंगे जुदा ना हम','कुबूल है','इश्क मे मरजावाँ' यासारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :राकेश बापटटिव्ही कलाकारदुबईहॉस्पिटल