ठळक मुद्देउतरन या मालिकेत तिने तपस्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका नकारात्मक असली तरी या भूमिकेने रश्मीला खरी ओळख दिली.
‘उतरन’ या मालिकेत तपस्याची भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रश्मी देसाई दीर्घकाळापासून छोट्या पडद्यावर दिसलेली नाही. अलीकडे कुठल्या अवार्ड शो वा इव्हेंटलाही ती दिसत नाही. काही दिवसांपूर्वी रश्मीने आपले काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. यात तिचे वजन बरेच वाढलेले दिसतेय. याचे कारण म्हणजे, रश्मीला झालेला आजार.
होय, रश्मी सोरायसिस या आजाराने ग्रस्त आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये तिला हा आजार झाल्याचे निदान झाले होते. रश्मीने खुद्द हा खुलासा केला होता. ‘मला सोरायसिस आजार असल्याचे निदान झाले आहे. या आजारातून बाहेर येण्यासाठी बराच वेळ जातो. कित्येकदा तो पूर्णपणे बराही होत नाही. गेल्या चार महिन्यांपासून मी स्टेरॉईड उपचारांवर आहे. ज्यामुळे माझे वजनही वाढले आहे. मला उन्हात जाण्याची परवानगी नाही, असे तिने सांगितले होते.
खरे तर एक अभिनेत्री असल्याने या आजारपणाविषयी कोणालाही काहीच न सांगण्याचा सल्ला रश्मीच्या मित्रमंडळींनी तिला दिला होता. पण, हा आजार बरा होऊ शकतो आणि तो लपवण्याचे काहीही कारण नाही, अशीच भूमिका तिने घेतली होती.
रश्मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. मॉडेलिंगमध्ये तिला कमालीचा इंटरेस्ट होता. याच काळात भोजपुरी चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली. तिने अनेक भोजपुरी चित्रपटांत काम केले आहे. यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. उतरन या मालिकेत तिने तपस्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका नकारात्मक असली तरी या भूमिकेने रश्मीला खरी ओळख दिली. यानंतर फिर कोई है, इश्क का रंग सफेद, दिल से दिल तक, परी हूं मैं या मालिकेत ती दिसली. नच बलिए आणि झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली. 2012 मध्ये तिने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्न केले होते. पण चार वर्षांनंतर दोघांनीही घटस्फोट घेतला.