देशभरातील लहान मुलांकडून सादर झालेल्या धमाकेदार गाण्यांनी अनेक वर्षे टीव्हीवर वर्चस्व गाजविलेल्या गायकांचा शोध घेणाऱ्या ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअलिटी कार्यक्रमाची नवी आवृत्ती लवकरच प्रसारित होणार आहे. ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअलिटी कार्यक्रमाची शेवटची आवृत्ती तब्बल नऊ महिने यशस्वीरीत्या पार पडली होती. त्या आवृत्तीने लोकप्रियतेच्या आलेखावर सदैव अग्रस्थान प्राप्त केले होते आणि श्रेयन भट्टाचार्य, अंजली गायकवाड आणि ‘छोटे भगवान’ जयसकुमार यासारखे काही अतिशय गुणी बालगायक प्रेक्षकांपुढे सादर केले होते. अशा गुणी बालगायकांचा शोध घेऊन त्यांना इतक्या लहान वयात त्यांची गायनकला व्यापक प्रेक्षकांपुढे सादर करण्यासाठी सुयोग्य व्यासपीठ देण्याची परंपरा पुढे चालवीत या कार्यक्रमाने आता नव्या बालगायकांच्या शोधासाठी या कार्यक्रमाची नवी आवृत्ती जाहीर केली आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या या नव्या आवृत्तीबद्दल एक विशेष महत्त्वाची घडामोड म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आता तरुणींच्या हृदयची धडकन असलेला देखणा अभिनेता रवी दुबे करणार आहे.
‘झी टीव्ही’वरील अत्यंत लोकप्रिय ‘जमाई राजा’ या मालिकेत नायकाची भूमिका सादर केल्यानंतर रवी दुबे हा गुणी अभिनेता आता या वाहिनीवर तब्बल तीन वर्षांनी परतणार आहे. रवी म्हणाला, “माझं लहान मुलांशी एक भक्कम नातं असून मला त्यांच्या अवतीभोवती राहायला आवडतं. मी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी स्वीकारली याचं खरं कारण असं की तब्बल 23 वर्षांनंतरही भारतातील गाणंविषयक अस्सल रिअॅलिटी कार्यक्रम हे आपलं स्थान ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाने कायम राखलं आहे. आपल्या कार्यक्रमात सतत बदल करून त्याने प्रेक्षकांच्या अभिरुचीशी नातं कायम ठेवलं असून इतक्या वर्षांत या कार्यक्रमातून जे गुणी गायक तयार झाले आहेत, त्यांच्याबद्दल मला खूपच आदर आहे.”
तो सांगतो, “अभिनयाइतकंच मला कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायलाही खूप आवडतं. खरं तर इतक्या वर्षांनंतर सूत्रसंचालनाची मला आवडच निर्माण झाली आहे. आता ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’सारख्या एका प्रतिष्ठित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत असल्याचा मला खूप आनंद होत असून मी झी टीव्ही वाहिनीशी नेहमीच निगडित राहिलो आहे. या वाहिनीवर काम करणं म्हणजे स्वगृही परतण्यासारखं आहे.” ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाच्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करण्यासाठी रवी दुबे खूप उत्सुक आहे.