कोवळ्या वयातील पहिलं प्रेम अयशस्वी होणं, त्यानंतर ती अपूर्ण प्रेमकहाणी सत्यात आणण्यासाठी दगडू काय करतो हे पाहणं आणि आता पहिलं प्रेम हरवल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या दगडू परबमध्ये झालेला बदल पाहणं अशा तीन टप्प्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या टाइमपास सिनेमाचा प्रत्येक भाग हा दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खऱ्या आयुष्याशी जोडलेला आहे. हा तर माझ्या आयुष्याचा सिनेमा आहे असं म्हणत रवी जाधव यांनी एका ओळीत टाइमपास ३ या सिनेमाची व्याख्या केली आहे. रवी जाधव यांनी आपलीच गोष्ट या सिनेमातून मांडल्याने त्यांचं या पडद्यावरच्या दगडूशी नेमकं काय नातं आहे हे घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीजने आणली आहे. रविवार दि. २० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता आाणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर टाइमपास ३ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
टाइमपास ३ या सिनेमाला चित्रपटगृहात जोरदार प्रतिसाद मिळाला होता. प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही नवी जोडी या निमित्ताने जमली.
यानिमित्ताने बोलताना रवी जाधव म्हणाले, '' टाइमपास १ आणि टाइमपास २ या सिनेमांतील दगडू आणि टाइमपास ३ या सिनेमातील दगडू यामध्ये जो बदल आहे तो त्याच्या आयुष्यात आलेल्या मुलीमुळे झाला आहे. माणसाचं आयुष्य हे त्याची परिस्थिती घडवत असते. पण तीच परिस्थिती त्याला केवळ टाइमपास नव्हे तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीही देत असते हा संदेश हलक्याफुलक्या आणि मजेशीर गोष्टीतून देण्याचा प्रयत्न टाइमपास ३ या सिनेमातून केला आहे. टाइमपास सिनेमातील तिन्हीही भागांमध्ये भेटणारा दगडू खरंतर माझंच प्रतिबिंब आहे. मीदेखील कधी काळी वर्तमानपत्राची लाइन टाकली आहे. शाळा कॉलेजमध्ये अशाच टपल्या मारल्या आहेत. मुलीच्या मागे लागण्याचा अनुभव घेतला आहे. यावर सिनेमा बनवावा हा विचार डोक्यात आला आणि टाइमपास या सिनेमाची तीन पुष्पं गुंफली गेली.'' रवी जाधव आणि दगडू शांताराम परब यांच्या आयुष्यातील खूप गोष्टी एकसारख्या असल्यामुळेच टाइमपास ३ बनवण्याचा विचार रवी जाधव यांच्या मनात आला तेव्हा दगडूच्या आयुष्यात येणारी नवी मुलगी कशी असेल यावर या सिनेमाची कथा बांधण्यात आल्याचं रवी यांनी सांगितलं. टाइमपास ३ या सिनेमातही कथा, संवाद यासोबत गाण्यांवर रवी जाधव यांनी खूप मेहनत घेतली आहे. ''मीसुध्दा आयुष्यात दगडू परबचं आयुष्य जगलो आहे आणि या सिनेमात दिसणाऱ्या दगडूची गोष्ट म्हणजे माझीच गोष्ट आहे'', असं म्हणत रवी जाधव यांनी टाइमपास ३ या सिनेमाशी असलेलं कनेक्शन सांगितलं.