अभिनयाच्या जोरावर ७० ते ९०चं दशक गाजवलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिनेसृष्टीतील कलाकार रवींद्र महाजनी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिने आदरांलजी वाहिली आहे.
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचे जीममधील काही फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. “मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही एका जीममध्ये वर्कआऊट करायचो. त्यांच्या एका चित्रपटात काम करण्याची संधीही मला मिळाली होती. त्यांची स्टाइल त्यांनी कायम तशीच ठेवली होती. मी त्यांना कधीही भेटले तरी हँडसम हंक असं म्हणायचे,” असं रुपालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“गश्मीरने माझ्या ‘देवता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये...”, रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केलेली इच्छा
“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक
रवींद्र महाजनी यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.