छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शो होस्ट करणारी मिनी माथुर सर्वांच्याच लक्षात असेल. अभिनेत्रीसोबतच ती उत्तम होस्ट आहे. तिने 'इंडियन आयडॉल' हा प्रसिद्ध रिएलिटी शो चा पहिला भाग होस्ट करत पदार्पण केलं आणि पुढे 6 सीझन होस्ट केले. सूत्रसंचालनाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या चेहऱ्यांपैकी मिनी माथुर (Mini Mathur) एक आहे. आपला २८ वर्षांचा अनुभव तिने नुकताच शेअर केला. तसंच आजकालच्या होस्टिंगवरही प्रतिक्रिया दिली.
मिनी माथुरने सध्याच्या होस्टिंग कौशल्यावर प्रश्न उपस्थित केला. हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना ती म्हणाली, "असं वाटतं की कोणत्याच कौशल्याची गरजच नाहीए. ज्याचे जास्त फॉलोअर्स आहेत किंवा जो डेली सोपमध्ये काम करतो त्याला घ्या, टेलिप्रॉम्प्टरवर वाक्यच्या वाक्य द्या आणि तो होस्ट करायला तयार. हे लोक प्रेजेंटर टीव्ही होस्ट बनण्यासाठी कमिटेड नसतात तेव्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी निर्माते शोमध्ये उगाचच तमाशा आणतात."
गरोदरपणामुळे शोमधून काढून टाकण्यात आलं यावर मिनी म्हणाली, "जेव्हा मी गरोदर होते तेव्हा ज्या शोची मी अनेक सीझनपासून होस्ट होते त्याच्या निर्मात्यांनी मला सांगितलं की भारतीय प्रेक्षकांना टीव्हीवर गरोदर महिला बघायला आवडत नाही. मला त्यांचं म्हणणं खूप लागलं."
"मी आंतरराष्ट्रीय शो होस्ट ऑपेरासारख्या एका सिग्नेचर शोसाठी पायलट एपिसोड शूट केले होते. पण शोचं स्टँडर्ड पाहता त्यांनी मोठ्या सुपरस्टारला घेण्याचं ठरवलं. पण असे शो चालले का? तुम्हाला आठवतो का असा कोणताही शो? कारण अभिनेता अभिनय करतात, सर्जन सर्जरी करतात, तसंच टीव्ही प्रेजेंटर्स होस्ट करतात. तरी मला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर आणि सलमान खान यांचं होस्टिंग आवडतं." असंही ती म्हणाली.