Join us

​या कारणामुळे ‘यह उन दिनों की बात है’ फेम रणदीप रायला आठवले कॉलेजचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:48 AM

कॉलेजच्या आठवणी या प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा भाग बजावत असतात. लोकांना पुन्हा पुन्हा त्या सोनेरी आठवणी जगायला आवडतात. पहिले प्रेम, ...

कॉलेजच्या आठवणी या प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा भाग बजावत असतात. लोकांना पुन्हा पुन्हा त्या सोनेरी आठवणी जगायला आवडतात. पहिले प्रेम, गोड प्रेम कथा, रंगीबेरंगी स्वप्नाळू जीवन, सोबत्यांसोबात घालवलेले स्वच्छंद क्षण हे आपण कधीच विसरू शकत नाही. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘यह उन दिनों की बात है’ या मालिकेत प्रेक्षकांना नव्वदच्या दशकातील शालेय जीवन पाहायला मिळाले होते. आता या मालिकेतील सर्व कलाकार कॉलेजमध्ये प्रवेश करून प्रेक्षकांच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. समीरची भूमिका साकारणारा रणदीप राय आगामी भागांचे चित्रीकरण करण्यास अत्यंत उत्साहित आहे. कॉलेज जीवनाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी रणदीप उच्च शिक्षणासाठी पुणे येथील कॉलेजात त्याने घालवलेल्या आठवणींमध्ये रमून गेला. युनिटच्या लोकांनी त्याला आपल्या सह-कलाकारांसोबत कॉलेजच्या गप्पा मारताना पाहिले. कॉलेजचा पहिला दिवस कसा होता, त्या काळात झालेले त्याचे मित्र, त्याला आवडलेल्या मुली, मित्रांसोबत कॅंटीनमध्ये खाद्य पदार्थांवर ताव मारताना केलेल्या गप्पाटप्पा, आवडते प्राध्यापक, कॉलेजमधील समारंभ आणि इतर बऱ्याच काही आठवणी त्याने सांगितल्या. आपल्या सह-कलाकारांना त्याने कॉलेजमधील फोटो दाखवले आणि त्या फोटोंच्या मागील रोचक गोष्टी देखील सांगितल्या. रणदीपमुळे सेटवरील सर्व जण आपापल्या आठवणी सांगण्यात रंगून गेले होते. आपल्या आठवणींबद्दल बोलताना रणदीप सांगतो, “माझे कॉलेजचे दिवस खूप सुंदर होते आणि माझ्या जीवनातील ते सर्वात स्वच्छंदी दिवस होते आणि बहुधा सर्वांच्या बाबतीत असेच असते. मित्रांसोबत फिरण्यासाठी मी अनेक लेक्चर्स बुडवली आहेत. बर्‍याचदा आम्ही एखादे लेक्चर बुडवून कॅंटीनमध्ये एकत्र बसायचो आणि समोसे आणि कोल्डड्रिंकचा आनंद घेत घेत अंताक्षरी खेळायचो. आमच्या ग्रुपमध्ये मी सर्वात खट्याळ होतो आणि मित्रांची मी नेहमी फिरकी घ्यायचो. त्या दिवसांची आठवण आली की, माझ्या ओठावर हसू येते आणि डोळे ओले होतात. आता काळ बदलला आहे. माझे सर्व मित्र आपापल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात मग्न आहेत. पण तरी आम्ही मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतो. कॉलेजच्या जीवनात आमच्यात जो बंध होता तसाच आज देखील आहे. मालिकेत कथानकाच्या या टप्प्यामुळे मला माझ्या जीवनातील ते गोड दिवस आठवले. नव्वदचे दशक हा सुंदर काळ होता, त्यावेळी आज सारखी तंत्रज्ञानाची प्रगती झाली नसल्याने लोक जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांच्या सहवासात घालवायचे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हे आगामी भाग आवडतील.”Also Read : यह उन दिनो की बात है या मालिकेत समीर दिसणार या अभिनेत्याच्या लूकमध्ये