Join us

शशांक केतकरने पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारण्यामागचे सांगितले खरे कारण, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 13:42 IST

'पाहिले न मी तुला' या मालिकेतील त्याने साकारलेल्या समर जहागीरदार या खलनायकाच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळतेय.

रसिकांचा आवडता अभिनेता शशांक केतकरनं आजवर विविध मालिकांमध्ये नायक म्हणून लोकप्रियता मिळवली. पण सध्या झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकेतील त्याने साकारलेल्या समर जहागीरदार या खलनायकाच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळतेय. शशांक केतकरने भूमिकेविषयी सांगतिले की, आधीपासूनच खलनायक साकारायचा होता. माझ्यासारख्या आखीव रेखीव चेहरा असणाऱ्याला अभिनेत्याला नायक म्हणूनच काम करावं लागतं की काय; अशी मला भीती वाटू लागली होती. 

माझ्यातला अभिनेत्याला वाव मिळण्यासाठी मला काहीतरी वेगळं करायचं होतंच. मला समर या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मी त्वरीत होकार कळवला. खलनायक किंवा वाईट वागणारी माणसं ही शरीरानेच अवाढव्य वगैरे असतात असं नाही. वाईट वागणं ही एक वृत्ती असते. ही वृत्ती मला साकारायची आहे असा मी विचार केला, त्यामुळे गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या.

या भूमिकेनंतरही मला पुन्हा नायक साकारण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की विचार करणार. प्रेक्षकांच्या मनात मी नायक म्हणून कसा आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तेव्हा ते मला नायक म्हणून निश्चितच स्वीकारतील. मी कोणतंही पांघरुण न घालता, गोड गोड न बोलता थेट व्यक्त होतो याचा मला अभिमान आहे. मला उगाचच कौतुक करणं वगैरे आवडत नाही.

 

सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहे. तुम्ही योग्य पद्धतीनं, मर्यादीत राहून तिथे व्यक्त होऊ शकता. आपल्या सभोवताली वाईट जगसुद्धा आहे. त्यामुळे जाता जाता माझ्यामुळे एक टक्का जरी सकारात्मकता मी पसरवू शकलो, तर मला ते आवडेल. माझ्या विरोधाभासांचा अर्थ ज्यांना समजतो त्यांना त्यामागचा उद्देशही कळतो. 

टॅग्स :शशांक केतकर