Join us

​‘नकळत सारे घडले’च्या सेटवर या कारणामुळे झाले जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:17 AM

नकळत सारे घडले’ या मालिकेच्या सेटवर नुकतेच जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. सेटवर सेलिब्रेशन करण्यामागे एक खास कारण होते. नुकत्याच ...

नकळत सारे घडले’ या मालिकेच्या सेटवर नुकतेच जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. सेटवर सेलिब्रेशन करण्यामागे एक खास कारण होते. नुकत्याच झालेल्या संस्कृती कला दर्पण पुरस्कारांमध्ये स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार पटकावला. याच कारणामुळे नकळत सारे घडलेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. मालिकेला एकूण चार पुरस्कार मिळाल्याने सेटवर संपूर्ण टीमला चार दिवस गोडाधोडाची मेजवानी मिळाली. संस्कृती कला दर्पण पुरस्कारांमध्ये नकळत सारे घडले या मालिकेला एकूण सहा नामांकनं मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता (हरीश दुधाडे), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नुपूर परुळेकर), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (निरंजन पत्की) हे चार पुरस्कार या मालिकेला मिळाले. पुरस्कार मिळाल्यानंतर मालिकेची टीम पुन्हा सेटवर आली. मिळालेल्या ट्रॉफिजची प्रॉडक्शनपासून निर्मात्यांपर्यंत प्रत्येकाने पूजा केली. सेटवर केकही कापण्यात आला. त्यानंतर पुढचे चार दिवस सेटवर सेलिब्रेशन करायचे ठरले. त्यानुसार हरीशने मोतीचुराचे लाडू, दिग्दर्शक निरंजन पत्कीने केक, निर्मात्यांनी मिठाई आणि नुपूरने सेटवर आईस्क्रीम आणले होते. याविषयी हरीश दुधाडे सांगतो, ‘मालिका सुरू होऊन सहा महिनेच झाले आहेत. एवढ्या कमी कालावधीत मालिका प्रेक्षकांना आवडणं, त्यावर पुरस्काराची मोहोर उमटणं हे फार क्वचित घडतं. मात्र, हा मान नकळत सारे घडले या मालिकेला मिळाला आहे. यात स्टार प्रवाहच्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर यांच्यापासून अगदी स्पॉटबॉयपर्यंत प्रत्येकाचे कष्ट, परिश्रम आहेत. या सर्वांमुळेच हे यश मिळाले आहे. या यशाचा आनंद आम्ही सेटवर उत्साहात साजरा केला.' नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडली जात आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने या मालिकेसाठी केली आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीचत प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.  Also Read : नकळत सारे घडले या मालिकेतील परीची १०० मुलांच्या ऑडिशनमधून झाली निवड