सुखी संसाराचा भक्कम पाया असतो तो म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. पण याच विश्वासाला जेव्हा धक्का लागतो तेव्हा नात्यात येतो कडवटपणा. नेमक्या याच परिस्थीतीचा श्रीधर आणि रेवती सामना करत आहेत. श्रीधरवरच्या विश्वासाला तडा जाण्यासाठी कारणीभूत ठरतेय ती आनंदी. एका षडयंत्रात आपलं संपूर्ण कुटुंब गमावलेल्या आनंदीच्या मदतीला श्रीधर धावून आला. आनंदीला मदत करण्याच्या निष्पाप हेतूने श्रीधरने तिला आपल्या घरी राहण्याची परवानगीही दिली. मात्र हीच मदत आता त्याच्या अंगलट येणार आहे. आनंदी आणि श्रीधरमधली ही वाढती मैत्री रेवतीला खटकू लागलीय. आता तर सासुबाई आणि आनंदीचीही चांगली गट्टी जमू लागलीय. त्यामुळे रेवतीचा मनस्ताप आणखी वाढलाय. इकडे आड आणि तिकडे विहिर अशीच काहीशी अवस्था रेवतीची झालीय. त्यामुळे या कठीण प्रसंगाचा रेवती कसा सामना करणार याची उत्सुकता आहे.
अक्षर कोठारीने आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे छोटी मालकीण या मालिकेतील भूमिका देखील तो तितक्याच ताकदीने साकारेल अशी त्याच्या मालिकेच्या टीमला खात्री होती. 'छोटी मालकीण' या मालिकेत अक्षरबरोबर एताशा संझगिरी दिसतेय. एताशा 'रेवती' ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. एताशाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत ती डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिलराजे शिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशा अनुभवी कलाकारांबरोबर दिसणार आहे.